टी २० वर्ल्ड कपमध्ये भारत- पाकिस्तानची दुबईत टक्कर !
नवी दिल्ली : 17 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी देशांचा समावेश एकाच गटात झाला आहे. त्यामुळे गटवार साखळीपासून आपल्याला दोन्ही टीम दरम्यानच्या लढती अनुभवता येणार आहेत.
२४ ऑक्टोबरला दुबईत दोन्ही टीमची साखळी सामन्यात गाठ पडेल. यापूर्वी २०१९ च्या इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान टीमची एकमेकांशी गाठ पडली होती. आणि ती हाय-प्रोफाईल मॅच भारताने 89 रननी जिंकली होती. रोहीत शर्माने त्या मॅचमध्ये दमदार 140 रन केले होते तर कॅप्टन विराट कोहलीने 77. त्यानंतर पावसाने आलेल्या व्यत्ययामुळे पाकिस्तानच्या वाट्याला 40 ओव्हर आल्या. आणि पाकिस्तान 6 विकेटवर 212 रनचीच मजल मारू शकले. त्यापूर्वी 2017मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मात्र गटवार मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव करून सुद्धा फायनलमध्ये पाकिस्तानची टीम विजयी झाली होती. आणि ही मॅच त्यांनी तब्बल 180 रन्सनी जिंकली होती. आता पुन्हा या दोन टीम एकमेकांशी टी-20 फॉरमॅटमध्ये भिडणार आहेत.
टी-20 वर्ल्ड कपचा नवा फॉरमॅट
17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर अशी साधारण महिनाभर चालणारी ही स्पर्धा यंदा दोन गटात खेळवली जाणार आहे. टीमच्या आयसीसी रँकिंग नुसार हे गट ठरवण्यात आले आहेत. पहिल्या गटात श्रीलंका, बांगलादेश, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, पापुला न्यू गिनी, नामिबिया आणि यजमान ओमान असे आठ देश असतील. या टीमची गट ‘ए’ आणि गट ‘बी’ अशी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. या दोन्ही गटातल्या प्रत्येकी दोन टीमना सुपर ट्वेल्व्ह गटात प्रवेश मिळेल. सुपर बारा टीमच्या मॅच सुरू होतील 23 ऑक्टोबरपासून. यात पहिल्या गटात आहेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका तसंच ए गटातली अव्वल आणि बी गटातली दुसऱ्या क्रमांकाची टीम. तर दुसऱ्या गटात भारत आणि पाकिस्तान बरोबरच अफगाणिस्तान, न्यूझीलंड यांच्याबरोबरच ए गटातली दुसऱ्या क्रमांकाची आणि बी गटातली अव्वल टीम आहे. सुपर बारा गटातली पहिली मॅच 23 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तगड्या टीम दरम्यान होणार आहे. तर त्याच दिवशी उशिरा इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या टीमही एकमेकांना भिडतील. तर 24 तारखेची भारत-पाकिस्तान दरम्यानची लढत संध्याकाळी साडेसात वाजता दुबईत सुरू होईल. स्पर्धेची सेमी फायनल 10 आणि 11 नोव्हेंबरला होईल. तर फायनल मॅच 14 नोव्हेंबरला होणार आहे. फायनलसाठी 15 नोव्हेंबरचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेची पहिली फेरी ओमान, आबुधाबी आणि शारजा या शहरांमध्ये पार पडेल. तर सुपर बारा पासूनच्या मॅच शारजा, दुबई आणि आबुधाबीमध्ये होतील. फायनल अर्थातच दुबईमध्ये होणार आहे.
यापूर्वी दोनदा झालाय स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल
खरंतर यापूर्वी 2020मध्ये ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा होणार होती. पण, कोरोना व्हायरसच्या जागतिक आरोग्य संकटामुळे ही स्पर्धा पहिल्यांदा पुढे ढकलण्यात आली. कोरोनाच्याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या आयोजनासाठी असमर्थता दाखवल्यावर ऑक्टोबर 2021 दरम्यान भारतात ही स्पर्धा आयोजित करण्याचं ठरलं. पण, तोपर्यंत भारतातही दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू झाला. आणि अखेर पर्यायी व्यवस्था म्हणून युएईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होत आहे. त्यापूर्वी इंडियन प्रिमिअर लीग या बीबीसीआयच्या घरगुती लीगच्या मॅचही युएईमध्ये पुढच्या महिन्यात होणार आहेत.