… तर “त्या” संधीचं नक्कीच सोनं करू ; राजकीय इनिंग बाबत शिल्पा खोतांचं सूचक वक्तव्य !

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरात ऑक्टोबरच्या सुमारास नगरपालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असली तरी पालिका निवडणूकीची रणधुमाळी शहरात सुरू झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचे जाहीर केले असून नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण पडल्यास शिवसेनेच्या उमेदवार कोण ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून सामाजिक क्षेत्रातील धडाडीचं नेतृत्व असलेल्या सौ. शिल्पा यतीन खोत यांचं नावही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर सौ. खोत याना मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत छेडले असता पक्षाने आपल्यावर विश्वास टाकत संधी दिली तर आपण नक्कीच त्या संधीचं सोनं करू, अशी प्रतिक्रिया शिल्पा खोत यांनी दिली आहे.

मालवण नगरपालिकेची मुदत संपली असून पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. कोरोना महामारीमुळे नगरपालिकांच्या निवडणुका पुढे गेल्या असून पावसाळ्यानंतर ऑक्टोबरच्या सुमारास या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. मालवण नगर परिषदेच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी जनतेतून निवडणूक होत शिवसेनेचे महेश कांदळगावकर हे विजयी झाले. त्यानंतर २०१९ मध्ये राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया रद्द करून निवडून येणाऱ्या नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याचे निश्चित केले. मात्र अलीकडेच राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारने पुन्हा एकदा जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण पडले तर शिवसेनेचा विचार करता सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत या सदरील पदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मागील आठ- नऊ वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून महिलांची मोठी फळी त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या त्या सुविद्य पत्नी असून यतीन खोत यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक वेळा सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावर त्यांची लक्षणीय उपस्थिती राहिली आहे. त्यामुळे भविष्यात मालवणात नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण पडल्यास सौ. शिल्पा खोत यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. या व्यतिरिक्त नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधून महिला प्रवर्गातील खुल्या जागेसाठीही त्यांच्या नावाची चर्चा आहे. या प्रभागात यतीन खोत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच शिल्पा खोत यांचे शहरात स्वतःचे अस्तित्व असून नगराध्यक्ष पदासाठी अन्य आरक्षण पडल्यास नगरसेवक पदासाठी प्रभाग तीन मधून सौ. खोत यांची दावेदारी आहे. मंगळवारी नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी सौ शिल्पा खोत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली असता पत्रकारांनी राजकीय इनिंगबाबत त्यांना छेडले असता पक्षाने संधी दिल्यास त्या संधीचे आपण नक्कीच सोनं करू, आपल्या माहेरी राजकिय वारसा नसला तरी लग्न होऊन सासरी आल्यावर पती यतीन खोत यांच्यासह सामाजिक आणि राजकिय पातळीवर आपण काम केलं आहे. आपल्या सासू सौ. पूनम खोत यांनी पंचायत समितीचे सभापती पदही भूषविले आहे. त्यामुळे आपल्याला संधी मिळाल्यास आपण त्या संधीचे सोनं करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सामाजिक क्षेत्रात काम करत असून त्याला राजकीय पदाची जोड मिळाल्यास अधिक व्यापक प्रमाणात महिलांसाठी काम करता येईल, असेही त्या म्हणाल्या.

पक्ष घेईल तो निर्णय मान्य !

संधी कोणाला द्यायची याबाबत वरिष्ठ पदाधिकारी निर्णय घेतील. पक्षात काम करताना सर्वसमावेशक विचार करून निर्णय घेतले जातात. पक्ष जो निर्णय घेईल, जो उमेदवार नगराध्यक्ष अथवा नगरसेवक पदासाठी असेल, त्यांना विजयी करणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. संधी आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीचे महत्व एकसमान आहे. म्हणजेच संधी मिळाली म्हणून काम करणार, या बरोबरच दुसऱ्याला संधी मिळाली तरी त्यासाठी काम करणार. ही शिकवण आमच्यात आहे. त्या दृष्टीने माझी जबाबदारी पार पाडणार. आमच्यासाठी संधी सोबत जबाबदारीही महत्वाची असल्याचे शिल्पा खोत यांनी म्हटले आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!