कुडाळ – मालवणात स्थानिक निवडणूका काँग्रेस स्वबळावर; प्रदेश काँग्रेस देणार ताकद !

कार्यकर्त्यांना पक्षीय ताकद देणार ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ग्वाही

मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसची बैठक संपन्न : अरविंद मोंडकर यांनी दिली माहिती

मालवण : आगामी काळात होणाऱ्या कुडाळ नगरपंचायत आणि मालवण नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वबळावर सहभागी होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत मांडला आहे. याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहमती दिली असून या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांना पक्षीय ताकद देण्याची ग्वाही दिली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे कुडाळ- मालवण निवडणूकीतील उमेदवार अरविंद मोंडकर यांनी दिली.

     महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा व विधानसभा २०१९ निवडणुकीतील उमेदवारांची बैठक गुरुवारी मुंबईत टिळक भवन येथे घेण्यात आली. या बैठकीत प्रांताध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री माणिकराव ठाकरे,  कार्याध्यक्ष तथा कोकण समन्वयक माजी मंत्री नसीम खान, माजी सामाजिक न्याय  मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री वसंत पुरके, पद्माकर वळवी, माजी खासदार संजय निरुपम, व इतर जेष्ठ  पदाधिकारी, लोकसभा- विधानसभा उमेदवार उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाला १० मिनिटे बोलण्याची संधी देऊन त्या त्या भागातील सध्याची पक्षाची ताकद, कार्यकर्त्यांच म्हणणे व भविष्यातील स्थानिक निवडणूका यावर चर्चा करण्यात आली. या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी कुडाळ मधील जबाबदारी संदर्भात व विधानसभा उमेदवार या नात्याने अरविंद मोंडकर यांनी या मतदारसंघातील सध्याची स्थिती, महविकास आघाडी सरकार मधील सत्यता व पदाधिकारी कार्यकर्ते यांची येत्या निवडणूक मधील मानसिकता या सर्व बाबीवर चर्चा करून कुडाळ नगरपंचायत व मालवण नगरपरिषदेच्या सर्व वार्डात स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले. यावर प्रदेश कढून सोबत काम करायला पदाधिकारी व दरम्यान आर्थिक ताकद देऊन काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी नक्कीच मदत करू असे नाना पटोले, नसिम खान, चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले. दरम्यान, लवकरच होणाऱ्या जिल्हा बँक निवडणूकीमध्ये या मतदारसंघातील सध्याचे संचालक यांस योग्य सन्मान मिळत असल्यास त्याबाबतचा अहवाल जिल्हाध्यक्षना देणार असून त्यावर जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील. पण जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व नगरपरिषद ह्या स्वबळावर लढणार असल्याचे प्रांताध्यक्ष यांना कार्यकर्त्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावर स्थानिक पातळीवर तुम्हीच निर्णय घ्या, असे नाना पटोले व उपस्थित वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. 

   निवडणूकीत पराभूत उमेदवारांना महाविकास आघाडी सरकार असून देखील जिल्ह्यास्तरीय, जिल्हा नियोजन, शासकीय कमिटीमध्ये घेतले जात नसल्याचे अनेक उमेदवारांनी सांगितले. यावर जिल्हाध्यक्षांच्या पत्रा सोबत मला नाव सुचवा, त्यानुसार त्या त्या जिल्ह्यातील संपर्क व आघाडी सरकार मधील पालकमंत्री यांच्याशी मी स्वतः बोलून समनव्यातुन ही पदे देऊ, असे नाना पटोले यांनी सांगितले.
 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अरविंद मोंडकर यांनी उपस्थित राहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कुडाळ- मालवण मतदारसंघातील रस्त्याच्या दुरुस्ती साठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलक्रीडा व्यावसायिकांना मत्स्यव्यवसाय, बंदर मंत्री अस्लम शेख यांनी केलेले सहकार्य व तौक्ते वादळ संदर्भात पहिल्यांदाच मिळालेल्या नुकसानभरपाई बद्दल पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आभार मानून अजूनही वाढीव निधी या वादळग्रस्तांना मिळवून देण्यासाठी चर्चा केली. तसेच देवबाग व तळाशील मध्ये कायमस्वरूपी रिंगरोड बंधारा व्हावा, यासाठी आवश्यक निधी देण्याबाबत पुढच्या कॅबिनेट मध्ये प्रस्ताव मांडू. त्यासाठी एक अहवाल बनवून तुम्ही पदाधिकारी मुंबईत या असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी तिथे येऊन पुन्हा पाहणी करायची असल्यास आपण स्वतः येऊ, असे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले आहे. त्यानुसार लवकरच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अरविंद मोंडकर यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!