औद्योगिक सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाबाबत अगोदर माहिती घ्या, नंतरच बोला !
उद्योग- व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांचे वैभव नाईकना प्रत्युत्तर
सर्वच गोष्टींकडे राजकिय चष्मा लावून पाहणे बंद करण्याचाही दिला सल्ला
कुणाल मांजरेकर
मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एमएसएमई मार्फत कणकवलीत आयोजित केलेल्या औद्योगिक मेळाव्याकडे भाजपा कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याच्या आ. वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेला भाजपा उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या औद्योगिक सक्षमीकरणाच्या कार्यक्रमावर टीका करण्यापूर्वी आमदारांनी त्याची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक होते. काही गोष्टी या भंपकपणाने करावयाच्या नसतात. ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवणे हा संकल्प ठेवून हा कार्यक्रम करण्यात आला होता. त्यामुळे वैभव नाईक यांनी सर्वच गोष्टीला राजकीय चष्मा लावून पहाणे आता बंद करण्याचा सल्ला श्री. केनवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एमएसएमई खात्यामार्फत नाविन्यपूर्ण उद्योगांची माहिती नवउद्योजकांना देण्याबरोबर नवीन उद्योगांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर काढावयाचे मार्ग याबाबत उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी कणकवली मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा पक्षीय कार्यक्रम नसून नवीन उद्योजकांना संधी देणारा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन उद्योग व उद्योग वाढीसाठी ३०३ उद्योजकांना उद्योग मंत्रालया अंतर्गत चार योजनेमार्फत १५ कोटी १७ लाख रुपये कर्ज उपलब्ध करून वितरित करण्यात आले. त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५१७ उद्योजकांना उद्योग आधारला मोफत लिंक करून देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध १३ गटाना स्फुर्ती योजनेची माहिती देऊन त्यासंबंधी आवश्यक कंपनी नोंदणीकृत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
उद्योग मंत्रालयाच्या एक्सपर्ट टीमने मालवण, देवगड येथे प्रत्यक्षपणे भेट देऊन मच्छीमारांसाठी आवश्यक कॉमन फॅसिलिटी सेंटर तसेच पर्यटन व्यवसायासाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर यासाठी सर्व्हें केला आहे. काही उद्योजकांच्या गाठीभेटी घेऊन या संबंधी माहिती देण्यात आली असून या दोन सेंटरसाठी भाजपा मालवणतर्फे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याच कार्यक्रमांतर्गत कुडाळ येथे आंबा बागायतदारांना आवश्यक असणारे प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट क्लस्टर मार्फत उभे राहत आहे. कॉयर बोर्ड मार्फत काथ्या उद्योगाचे कोकोपीट खरेदी प्रक्रिया उद्योग मंत्रालयातून सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा बरेच काथ्या उद्योजक सिंधुदुर्गात घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व फळांचा बहर ४५ दिवसाच्या पर्यंत असतो. कोकम सारखी फळे पावसाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात बहरतात व त्याचे मोठे नुकसान होते. म्हणून सर्व फळे कशी स्टोअर करून त्याच्यावर प्रक्रिया करता येईल यासाठी आवश्यक संशोधन उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत स्टार्टअप इंडिया मार्फत केले जात आहे. बरेच नाविन्यपूर्ण छोटे मध्यम प्रकल्प सिंधुदुर्गात स्थानिक उद्योजक उभारण्याचे धाडस करत आहे. त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम नारायण राणे यांच्या उद्योग मंत्रालयातून करण्यात येत असल्याचे श्री. केनवडेकर यांनी म्हटले आहे.
भारतातील तिसरे कॉमन फॅसिलिटी सेंटर सिंधुदुर्गात सुरू करण्याचा मानस
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने उद्योग मंत्रालयामार्फत फेब्रुवारीमध्ये सिंधुदुर्गनगरी व कणकवली येथे उद्योग मंत्रालया मार्फत माहिती व प्रसारण यासंबंधी दोन कार्यक्रम झाले होते. या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे व नवीन उद्योजक व तरुणांचा प्रतिसाद पाहता राणेसाहेबांनी असे कार्यक्रम तालुक्या तालुक्यात घ्यावे असे आदेश मंत्रालयाला दिले होते. याच अनुसरून कणकवली येथे कार्यक्रम घेण्यात आला होता. याचवेळी राणे साहेबांनी भारतातील तिसरे कॉमन फॅसिलिटी सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभे करण्याचा मानस बोलून दाखविला होता. यासंबंधी आवश्यक जागा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यास ३०० कोटीचे भव्य सेंटर उभे राहून तरुण उद्योजकांना याचा मोठा फायदा होणार आहे. आ. वैभव नाईक सत्तेत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांच्या कौशल्यासाठी राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाकडून जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा. नारायण राणे जिल्ह्यातून गेले की टिका करायची व जिल्हा नियोजनच्या सभेच्या वेळी ते समोर आल्यावर राणेसाहेबांच्या कानात गोष्टी सांगायच्या हे सर्व जनतेने पाहिले आहे. कोण तळ्यात आणि कोण मळ्यात हे जनता पूर्णपणे जाणून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता कधीच राणेची साथ सोडणार नाही. उद्योग मंत्रालयाची जबाबदारी राणेसाहेबांवर आल्यापासून पक्षाचे कार्यकर्ते तरुणांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या उद्योगाच्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे केनवडेकर यांनी म्हटले आहे.
सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उद्योग वाढीसाठी राणेंच्या संपर्कात
राणेसाहेबांकडे उद्योग मंत्रालय आल्यापासून सर्वपक्षीय कार्यकर्ते उद्योग वाढीसाठी राणेसाहेबांना भेटत असतात. याची पूर्ण जंत्री भाजपकडे उपलब्ध आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील शिवसैनिक व नेते पक्ष बाजूला ठेवून आपल्या भागात उद्योग उभारणीसाठी व त्या योजनेचा फायदा मिळविण्यासाठी मोठ्या मनाने राणेसाहेबांकडे जाऊन उद्योजकांना चालना देत आहेत. मराठी उद्योजक उभा राहत आहे म्हणून राणेसाहेबही पक्ष बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी काम पाहत आहेत. याचमुळे तीन महिन्याच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयाच्या कामकाज अहवालात उद्योग खात्याचा एक नंबर लागून ९८.८ % कामे पूर्ण केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेसाहेबांचे कौतुक केले आहे. मालवणात युवा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमार कॉमन फॅसिलिटी सेंटर व पर्यटन कॉमन फॅसिलिटी सेंटर उभे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक यांना एकत्रित करून या योजनेची पूर्ण माहिती जुलैमध्ये मालवणात देण्यात येणार आहे. या सेंटरचा पर्यटन वाढीसाठी व युवकांना अत्याधुनिक योजनेचा फायदा घेण्यासाठी उपयोग होणार आहे.
सिंधुदुर्गात भव्य कृषी महोत्सव नारायण राणे यांनी सुरू केला. शेतकऱ्यांना उपयुक्त कार्यक्रम म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने कृषी महोत्सव घेऊन आधुनिक यंत्रसामुग्री, आधुनिक शेती, फळबागायती मधील प्रयोग याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बागायतदार यांना करून दिली. जिल्हा आधुनिकीकरणाकडे नेण्याची मानसिकता या कृषी महोत्सवामुळे झाली. असे असताना आमदार साहेब फक्त आम्हीच कृषी महोत्सव यशस्वी केला म्हणून आपलीच पाठ थोपटून घेत आहेत. विरोधाला विरोध हे आता सोडून युवकांचे सक्षमीकरण करण्यासाठी उद्योग मंत्रालयातून होत असणाऱ्या प्रयत्नाला राजकारण बाजूला ठेवून त्यांनी सहकार्य करावे, कारण अशी संधी जिल्ह्याला पुन्हा उपलब्ध होणे शक्य नाही, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.