“त्या” धोकादायक वळणावर “सुरक्षागार्ड”चे काम सुरू; शिवसेनेच्या माजी लोकप्रतिनिधींची वचनपूर्ती
महेश कांदळगावकर यांच्यासह प्रभाग ८ च्या माजी नगरसेवकांचे नागरिकांनी मानले आभार
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण नगरपालिका प्रभाग ८ मधील वायरी गर्देरोड येथे गोवेकर घरानजीक असलेल्या धोकादायक वळण आणि व्हाळी नजीक अपघातांचे प्रमाण वाढल्याने येथील स्थानिक नागरिकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या प्रयत्नांमुळे या वळणावर सुरक्षागार्ड बसवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
वायरी गर्देरोड येथील या धोकादायक वळणावर गेली एक ते दीड वर्ष अपघाताचे प्रमाण वाढले होते. यामुळेच स्थानिक नागरिक गोवेकर, गावकर त्याचप्रमाणे संजय (बंटी) वराडकर, गणेश वराडकर प्रथमेश हिंदळेकर व वायरी वासीयांनी त्या ठिकाणी ठोस उपयोजना करावी अशी मागणी तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तत्कालीन नगरसेविका तृप्ती मयेकर, सेजल परब, पंकज साध्ये यांच्याकडे केली होती. त्यांनी येथील अपघातांची गंभीरता आणि गांभीर्य लक्षात घेऊन कार्यवाही केली आहे. याबाबत सामंत कुटूंबियांनी जागेसाठी सहकार्य केले. या व्हाळीवर राष्ट्रीय महामार्ग किंवा एखाद्या घाट रस्त्यावर ज्या प्रमाणात सुरक्षा गार्ड बसविण्यात येतात, त्या स्वरूपाचे सुरक्षा गार्ड बसविण्याचे काम सुरू आहे. येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. याबाबत येथील नागरिकांनी आभार मानले आहेत.