मुंबई – गोवा हायवेच्या दुरावस्थे विरोधात ५ सप्टेंबरला मानवी जन साखळी आंदोलन
मालवण : राष्ट्रीय खड्डे महामार्गातून कोकणवासीयांना मुक्ती मिळावी, राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ पुढील दोन वर्षात ठरल्याप्रमाणे वेळेत पूर्ण व्हावा, हायवे निर्मितीचा किमान दर्जा सांभाळावा, हजारो बळी घेणारी धोकादायक वळणे आणि घाट शक्य तितका सोपा व्हावा, यांसह अन्य विविध मागण्यांसाठी कोकण हायवे समन्वय समितीच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत नांदगाव तिठा येथे मानवी साखळी जनआंदोलन करण्यात येणार आहे. तर गेल्या ११ वर्षात जे हजारो कोकणवासीय हायवे वरील अपघातात मृत्युमुखी पडले, त्या दुर्दैवी बांधवांसाठी सकाळी ११ ते १२ या वेळेत अपघात बळी पडलेल्या नागरिकांसाठी श्रद्धांजली मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कोकण हायवे समन्वय समितीच्या वतीने डॉ. दीपक परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्रातील सगळे हायवे बांधून पूर्ण झाले आहेत. गेले अकरा वर्षे पनवेल ते इंदापूर आणि सहा वर्षे इंदापूर ते झाराप काम सुरू असून देशातील सर्वात संथ कामाचा विश्वविक्रम याठिकाणी होईल अशी भीती आहे. दरवर्षी विशेषतः पावसाळ्यात या महामार्गावर प्रचंड खड्डे पडतात आणि अनेक ठिकाणी महामार्गाची पायवाट होते. देशातील एक प्रमुख धोकादायक हायवे म्हणून कोकण महामार्ग ओळखला जातो. दरवर्षी शेकडो प्रवासी आणि कोकणवासीयांचा या ठिकाणी अपघातामुळे प्राण जात आहे. गेली चार ते पाच वर्ष दोन वर्षात हायवे पूर्ण होणार अशी आश्वासने मिळत आहेत, परंतु प्रत्यक्ष हायवेचे काम नजीकच्या भविष्यात पूर्ण होताना दिसत नाही. कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता व पावसाचे पाणी इकडून तिकडे पलीकडे कसे जाईल, याचा विचार न करता धरण बांधावे अशा पद्धतीने अनेक ठिकाणी भराव घातल्यामुळे महापूराला निमंत्रण देणारा हा हायवे बनत आहे. कोकणात प्रचंड गाळाने भरलेल्या नद्या साफ करून तो गाळ हायवेच्या भरावासाठी वापरणे अभिप्रेत असताना आजूबाजूचे डोंगर पोखरून मोठमोठे भराव घातल्यामुळे अतिपावसामुळे हे डोंगर कोसळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जुना हायवे मोठा केल्यामुळे अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आणि घाट तसेच आहेत, ज्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात अपघात होणार आहेत. हायवे वरील अनेक मोठी गावे आणि शिक्षण संस्थांमध्ये गावकऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी अंडरपास व अन्य सुरक्षेच्या व्यवस्था नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्यात अपघात संभवतात. यांसह अन्य विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण हायवे समन्वय समितीच्या माध्यमातून ५ सप्टेंबरला हे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे पालकत्व सुरेश मोर्ये करणार असून अधिक माहितीसाठी सुरेश मोरे 7588450589, डॉ. दीपक परब 9820632318, उत्तम दळवी 9769075036 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.