बापाशी वैर आणि मुलाशी दोस्ती ; खा. विनायक राऊतांवर उपरकरांची टीका
कणकवली : मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. विनायक राऊत यांचा नितेश राणे यांच्याशी दोस्तीचा विषय सध्या मातोश्रीवर पोहचला आहे. त्यामुळेच केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंना स्व. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊ देणार नाही, असे वक्तव्य करून आपण राणेंना विरोध करतो, असे भासविण्याचा खासदार राऊत यांनी प्रयत्न केला. राणेंविरोधात वेंगुर्ले राडा, कोरगावकर हल्ला, आमने-सामने यासह अनेकदा संघर्षाची वेळ आली, तेव्हा एकदाही विनायक राऊत नव्हते. त्यामुळे बापाशी वैर आणि मुलाशी दोस्ती ही विनायक राऊत यांची कार्यपद्धती असल्याचा आरोप श्री. उपरकर यांनी कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ता बिडवाडकर, दत्ताराम अमृते, शरद सावंत, संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते. भाजपा आमदार नितेश राणे आपले मित्र आहेत असे विनायक राऊत यांनी जगजाहीर पणे सांगल्यामुळे त्यांच्या बद्दल शिवसैनिक अस्वस्थ आहेत. पण बुंद से गयी वो हौद से आती नही. खासदार राऊत स्वतः सिंधुदुर्गात आणि राणेंना अडवणार मुंबईत असे वक्तव्य करून शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडण्याचा राऊत यांचा प्रयत्न होता. जेव्हा उमेश कोरगावकरचे पाय तुटला, वेंगुर्लेत झालेला राडा किंवा राणेंशी शिवसेनेचा अन्य ठिकाणी झालेला आमनेसामने असो, खासदार राऊत हे नेहमीच लपून राहिले. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनीही सिंधुदुर्गात जाहीर कार्यक्रमात एकमे कांचा उल्लेख सन्माननीय असा केला होता. पण मित्र म्हणून कधीच उल्लेख केला नाही. वेंगुर्लेतील कार्यक्रमात खासदार राऊत यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा नितेश राणेंचा उल्लेख स्वतःचे मित्र म्हणून केला. एकीकडे नारायण राणेंशी टक्कर देणारा मी एकटाच अशी डरकाळी फोडायची आणि दुसरीकडे त्यांचा मुलगा नितेश ला मित्र म्हणायचे हा दुटप्पीपणा शिवसैनिकांना रुचलेला नाही,असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.