पश्चिम किनारपट्टीवरून निघालेल्या सीआयएसएफच्या कोस्टल सायक्लोथॉन रॅलीचे मालवणात स्वागत 

किनारी भागात सुरक्षितेविषयी जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली ; कन्याकुमारी येथे होणार समारोप

मालवण : सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स तर्फे भारताच्या पश्चिम तसेच पूर्व समुद्र किनाऱ्यावरून कोस्टल सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले असून पश्चिम किनाऱ्यावर गुजरात कच्छ येथून निघालेली ही सायकल रॅली आज मालवणात दाखल झाली. यावेळी मालवण बंदर जेटी येथे या रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. या रॅलीत १२५ सायकलपटू सहभागी झाले असून त्यामध्ये १४ महिलांचा समावेश आहे. किनारी भागातील सुरक्षे बाबत जनजागृती करत निघालेली ही रॅली दोन्ही किनाऱ्यावरून ६५५३ किमी अंतर पार करून कन्याकुमारी येथे विसर्जित होणार आहे. मालवण येथून ही रॅली आज गोव्याच्या दिशेने रवाना झाली. 

केंद्रीय इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ) ची कोस्टल सायक्लोथॉन रॅली मालवण बंदर जेटी येथे दाखल झाली असता या सायकलपटुंचे स्वागत करण्यात आले. यावेळी भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सायकलपटुंचे औक्षण केले. यानंतर बंदर जेटी येथे आयोजित कार्यक्रमात पद्मश्री परशुराम गंगावणे व इतर मान्यवरांच्या दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सीआयएसएफच्या पश्चिम विभाग सायक्लोथॉनचे इन्चार्ज व्ही. एस. प्रतिहार, मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, बंदर निरीक्षक अनंत गोसावी, दिल से फाउंडेशनचे श्री. परशुराम, करुणा जळवी, ऍड. समीर गवाणकर आदी उपस्थित होते. 

यावेळी व्ही. एस. प्रतिहार यांनी या सायक्लोथॉन बद्दल माहिती देताना सीआयएसएफ च्या सायक्लोथॉन रॅलीला पश्चिम किनाऱ्यावर ७ मार्च पासून कच्छ येथून सुरुवात झाली असून त्याचप्रमाणे पूर्व किनाऱ्यावर बंगाल येथून सुरुवात झाली आहे. या दोन्ही सायकल रॅली कन्याकुमारी येथे १ एप्रिल रोजी एकत्र येऊन विसर्जित होणार आहेत. सुरक्षित किनारा समृद्ध भारत असा नारा देत काढण्यात आलेल्या सायकल रॅली द्वारे सागरी किनारीपट्टी भागातील सुरक्षितता निश्चित करणे, किनारी भागातून होणारे स्मगलिंग, गांजा विक्री, दहशतवादी कारवाया याबाबत किनारी भागातील लोकांना माहिती देऊन हे गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या रॅलीला किनारी भागातील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. प्रतिहार म्हणाले. 

पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले, भारत देश आता सक्षम बनत आहे. कोकणला सुमारे साडे सातशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे, किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने काढलेली ही रॅली कौतुकास्पद आहे. किनारपट्टी भागातील लोकांनी सतर्क राहिले पाहिजे, बाहेरून येणाऱ्या लोकांची चौकशी, तपासणी केली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी ऍड. गवाणकर यांनीही विचार मांडले. 

यावेळी मच्छिमार समाजाचे प्रतिनिधी रविकिरण तोरसकर यांनी उपस्थित मान्यवरांचे कवड्याची माळ देऊन स्वागत केले. यावेळी भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य सादर केली. या विद्यार्थिनींचाही टीशर्ट देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन ऍड. प्रथमेश सामंत यांनी केले. यावेळी परशुराम पाटकर, प्रा. पवन बांदेकर यांच्यासह सीआयएसएफचे जवान, पोलीस कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4195

Leave a Reply

error: Content is protected !!