सिद्धिविनायक बिलवडकरच्या हत्येला राणे बंधूंमुळेच फुटली वाचा;वैभव नाईक दोन वर्ष घालत होते पाठीशी


शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आरोप
मालवण प्रतिनिधी :
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेकडून रखडलेल्या फाईलचा तपास योग्यप्रकारे करण्यात येत आहे. त्यामुळेच बेपत्ता सिद्धीविनायक बिडवलकर याच्या हत्येला वाचा फुटली आहे. यात माजी आमदार वैभव नाईक हे खोटे आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत. संशयीत आरोपी असलेला सिद्धेश शिरसाट याला वैभव नाईक यांचाच आशिर्वाद असल्याने गेली दोन वर्षे हे प्रकरण दाबून ठेवण्यात आले होते. यामुळे नाईक यांनी आताच्या सत्ताधाऱ्यांसोबतच शिरसाट याचे फोटो व्हायरल करताना नाईक यांच्यासोबतच्याही फोटोंचा अल्बमच आम्ही व्हायरल करू असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कुंभारमाठ येथील निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगरसेवक दिपक पाटकर उपस्थित होते. यावेळी सामंत यांनी वैभव नाईक यांच्यासमवेत सिद्धेश शिरसाट याचे असलेली छायाचित्रेच सादर केली आणि नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हयाचे नाव बीड जिल्हयाशी जोडून या जिल्ह्याची बदनामी केली आहे त्यामुळे या प्रकरणातील खरा आक्का कोण हे आम्हाला बाहेर काढायला लावू नका असा इशारा श्री सामंत यांनी यावेळी दिला.
वैभव नाईक यांनी गेल्या दहा वर्षात जनतेच्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारे योग्य निर्णय न घेतल्यानेच जनतेने त्यांना घरी बसवले आहे आणि भविष्यातील पंचवीस वर्षे तरी नाईक हे विजयी होण्याची शक्यताच कमी असल्याने आणि आता ते रिकामीच असल्याने नाहक आरोप करत आहेत. दोन वर्षांपुर्वी घडलेल्या घटनेवर जर नाईक यांनी आवाज उठविला असता तर आरोपी त्याचवेळी पकडले गेले असते आणि त्यावेळी जनतेलाही समजले असते की आरोपी कोणासोबत आणि कोणाच्या आशिर्वादाने फिरत होते? आता नाईक यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार आहे. दोन वर्षांपुर्वी आमदार असताना त्यांना न्याय देता आला नाही, यामुळे आपले अपयश लपविण्यासाठी विद्यमान आमदारांवर टिका करण्याचे धाडस नाईक करत आहेत. मात्र मालवण कुडाळ मतदार संघांतील जनता सुज्ञ आहे, त्यांना सर्व काही माहिती आहे, असाही टोला श्री. सामंत यांनी लगावला.
बिडवलकर यांचा खून सुमारे दोन वर्षापूर्वी झाला. त्यावेळी आमदार म्हणून या मतदार संघाचे नेतृत्व वैभव नाईक करत असताना त्यांच्यासोबत उबाठामध्ये काम करणारे आरोपी शिरसाट हे उबाठा मध्येच होते. आता नाईक बोंब मारतायत आणि सिंधुदुर्गची तुलना बीड जिल्हयाबरोबर करत असताना सिंधुदुर्ग जिल्हयाला बदनाम करण्याचे काम नाईक हे करत आहेत. शिरसाट त्यांच्याच पक्षात होता. त्याचे जे व्यवसाय होते हे नाईकांच्याच आशिर्वादाने सुरु होते मग दोन वर्ष वैभव नाईक गप्प का होते? याचेही उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. निलेश राणे हे आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थान कुडाळ मालवणची विकासात्मक घौडदौड सुरु झाली. मतदार संघातील प्रश्न असो जिल्हयातील प्रश्न असो अधिवेशनामध्ये अभ्यासपूर्वक असे प्रश्न मांडण्यात आले. हा जिल्हा प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी आमदार नीलेश राणे यांचे काम सुरु आहे आणि यामुळेच आज सर्वस्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. यामुळे काही झाले तरी राणेंवर ढकलायचे आणि एखाद्या व्यक्तिला बदनाम करण्याच काम करायच हे वैभव नाईक यांचे आता काम सुरू आहे. याला याठिकाणची जनताच उत्तर देईल, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.


