राजापूर येथील बैलगाडा शर्यतीत राज्यस्तरीय गटात नितीन देसाई प्रथम
जिल्हास्तरीय गटात द्वारकानाथ माने विजेतेपदाचे मानकरी ; आ. किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते उदघाट्न ; स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कुणाल मांजरेकर
राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश आडवरेकर मित्र मंडळ आणि शिवसेना राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या राज्यस्तरीय गटात पाली येथील नितीन मधुकर देसाई यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर आबासाहेब पाटील ( ससेगाव शाहुवाडी) व समर्थ महादेव खाडे (मोरोशी) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. यावेळी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वारकानाथ पांडुरंग माने (कुरचूव), स्वयंभू चरवेली (रत्नागिरी) आणि शुभम गांगण यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.
जांभवली माळ राजापूर रेल्वे स्टेशन नजीक ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ८० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह राज्याच्या अनेक भागातून बैलगाडा स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्याहस्ते पार पडले. कार्यक्रमाला अपूर्वाताई सामंत यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी आ. किरण सावंत यांच्या राजकीय आलेखाचा व काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले. तुम्हाला लाभलेल्या आमदाराचा उपयोग समाजोपयोगी कामासाठी करा, असे सांगून या मतदार संघाचा गेल्या पंधरा वर्षाचा वनवास आता संपला आहे, असे ते म्हणाले. तर संजय आंग्रे यांनी अपूर्वाताई यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळाले असून आता शिवसेनेला चांगले दिवस लाभले आहेत. सिंधुदुर्गात राणे बंधू तर रत्नागिरीत सामंत बंधू कोकणच्या विकासाचा ट्रॅक सोडणार नाही, असे सांगितले.
या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मुंबई येथील पदाधिकारी आशाताई उपनेते शिवसेना तसेच अंधेरी विधानसभा प्रमुख उपस्थित होते. त्याचबरोबर कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, खजिनदार भास्कर राणे, रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजू, राजापूर विधानसभा प्रमुख राजू कुरूप तसेच तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्यासह पाचाल विभाग प्रमुख शैलेश साळवी, केळवली विभाग प्रमुख नाना कोरगावकर, मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर व सर्व सहकारी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रवीण कानडे तसेच प्रल्हाद नारकर, सुकांत वरूणकर, मंगेश गुरव यांनी विशेष मेहनत घेतली.