बाळासाहेबांना दिलेल्या शब्दामुळे आजपर्यंत उद्धव ठाकरेंबाबत मौन ; पण आता सोडणार नाही, जाहीर सभेतून वचपा काढणार…
कुंभारमाठ येथील मेळाव्यातून खा. नारायण राणेंचा इशारा ; भाजपा – शिवसेनेत एकजूट असावी, आपापसात स्पर्धा नको
नारायण राणे हे कोकणला लाभलेले अनमोल रत्न ; निलेश राणेही संवेदनशील व भावनाप्रधान व्यक्तिमत्व, त्यांचा विजय काळ्या दगडावरची रेघ : मंत्री उदय सामंत यांचा विश्वास
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना सोडल्यानंतर एकदा मालवणच्या बंगल्यावर असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोन आला. मला म्हणाले, “नारायण तू शिवसेनेमुळे मोठा झालास. माझा उद्धव, आदित्य काहीही बोलले तरी तू वाईट बोलणार नाहीस हा शब्द मला दे’. त्यावेळी मी बाळासाहेबाना शब्द दिला. “साहेब मी आहे तो तुमच्यामुळे. माझे गुरु एकच ते म्हणजे तुम्ही. त्यामुळे मी उद्धव, आदित्य आणि ठाकरे परिवारातील कोणाही सदस्यावर वाईट शब्द बोलणार नाही”. बाळासाहेबाना दिलेल्या या शब्दामुळेच आजपर्यंत मी शांत राहिलो. पण आता पुरे झालं. काल उद्धव मालवणात आला आणि गाडायची भाषा करून गेला. त्याचा समाचार मी घेणारच. पण इथे नाही. जाहीर सभेतून त्याचं उत्त्तर देणार, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी कुंभारमाठ मधील शिवसेना भाजपच्या मेळाव्यात दिला. भाजपा – शिवसेनेत एकजूट असावी, आपापसात स्पर्धा नको, असा सल्ला देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी गतिमान विकास आणि लोककल्याकारी योजना राबवत देश प्रगतीपथावर नेत आहेत. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकार राज्यात आदर्शवत असे काम करत आहेत. हे जनतेचे सरकार आहे. आगामी निवडणुकीत जनतेच्या मोठ्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार विजयी होईल. सोबतच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्यातून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार नारायण राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला, विरोधकांचे विकासात योगदान काय? उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात शाळा तरी सुरु केली काय ? मुख्यमंत्री असताना कोरोना काळात औषध खरेदीत कमिशन खाणारे हे लोकं आहेत. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवार करू शकले नाहीत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखविले. लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचली. अनेक योजना या सरकारने आणल्या. त्यामुळे विरोधकांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करूया. कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला सर्व जागा जिंकून अबाधित ठेऊया असेही आवाहन खा. राणे यांनी केले.
कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा मालवण कुंभारमाठ येथील अथर्व सभागृहात पार पडला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना कुडाळ मालवण निरीक्षक बाळा चिंदरकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, रुपेश पावसकर, महिला उपजिल्हा प्रमुख नीलम शिंदे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, ऋत्विक सामंत, हर्षद पारकर, बाळू नाटेकर, मधुकर चव्हाण, राजेश हाटले यासह शिवसेना, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांच्या मोठया मताधिक्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी खासदार नारायण राणे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मोफत धान्य दिले, उपचारासाठी पाच लाखापर्यंत खर्च आयुष्यमान योजनेतून होणार आहे, पंतप्रधान आवास योजनेतून बारा कोटी घरे उभारून दिली. अकरा कोटी कुटुंबाना नळपाणी योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्याचं धर्तीवर महायुती सरकार अनेक जन हिताच्या योजना राबवत आहे. शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, तरुण वर्ग यासह सर्व घटकांसाठी हे सरकार तत्पर आहे. सोबतच विकासाचा आलेख गतिमान राहिला आहे. महायुती सरकार पुन्हा यावे, विकासाची गती कायम रहावे हा जनतेचा निर्धार आहे. त्यामुळे जनतेच्या पाठिंब्यावर हे सरकार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे खासदार राणे म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकरी राहणार नाही यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरु होत आहे. सोबत दोडामार्ग येथे 500 कारखाने सुरु होतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हे पूर्णपणे समृद्ध करायचे आहेत. असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तीनही उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त नाही. यावेळी संजय आंग्रे, बबन शिंदे, बाळा चिंदरकर, रत्नाकर जोशी यांनी विचार मांडताना निलेश राणे यांच्या मोठया विजयाचा विश्वास व्यक्त केला.
निलेश राणे हे अतिशय संवेदनशील असे भावनाप्रधान व्यक्तिमत्व आहे. राणेसाहेबांप्रमाणे त्यांच्यातही विकासाचे व्हिजन आणि ते करण्याची धमक आहे. सिंधुदुर्ग वासियांचे प्रेम हे नेहमीच राणे कुटुंबाच्या पाठीशी राहिले. या निवडणुकीतही येथील जनता निलेश राणे, नितेश राणे यासह दीपक केसरकर यांना बहुमताने विजयी करेल. आणि राणे कुटुंबासोबत आपण ठाम असल्याचे दाखवून देईल. असे सांगून उदय सामंत यांनी विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नाहीत. त्यामुळे राणे कुटुंब चिडले पाहिजे यासाठी खालच्या पातळीवरील टिका, वैयक्तिक टिका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र या टिकेला उत्तर जनताच मतपेटीतून देईल. असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. कोकणात नारायण राणे यांनी शिवसेना रुजविली. धनुष्यबाण घराघरात पोहचवीला. याचाही विशेष उल्लेख मंत्री उदय सामंत यांनी केला.
अपप्रचाराला महायुतीचे कार्यकर्ते बळी पडणार नाही : निलेश राणे
येणाऱ्या काही दिवसात विरोधकां कडून अपप्रचार केला जाईल, अफ़वा पसरवल्या जातील, मात्र महायुतीचे कार्यकर्ते आजपर्यंत कोणत्याही अफ़वांना बळी पडले नाही आणि पडणारही नाहीत. 23 तारिखला रत्नागिरी, सिंधुदुर्गातून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, सर्वत्र विजयी रॅली निघेल असे निलेश राणे यांनी सांगितले.