विकासाचा थांगपत्ता नसल्याने वैभव नाईकांवर गल्लोगल्ली कांदे बटाटे सारखी गाडी फिरवण्याची वेळ

भाजपाचे शक्तिकेंद्र प्रमुख केदार झाड यांचे हरी खोबरेकरांच्या टिकेला प्रत्युत्तर ; दहा वर्षात एकही प्रकल्प आणण्यात आमदार अपयशी

मालवण | कुणाल मांजरेकर

माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांना स्वतःच्या मुलासाठी घरोघरी फिरावे लागल्याची टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख केदार झाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खरं तर दहा वर्ष या मतदार संघाचा आमदार राहिलेल्या माणसाने विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जाणे आवश्यक होते. मात्र गेल्या दहा वर्षात आमदार नाईक हे या मतदार संघात विकासाचा कोणताही प्रकल्प आणू शकले नाहीत. पर्यटन आणि रोजगाराचा एकही प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. म्हणून आज त्यांची परिस्थिती गल्लोगल्ली फिरून कांदे बटाटे विकणाऱ्यांसारखी झाली आहे, अशी बोचरी टीका केदार झाड यांनी केली आहे.

गेल्या दहा वर्षात विकासाचा एक तरी प्रकल्प राबविला असता तर वैभव नाईक यांच्यावर मत मागण्यासाठी गल्लोगल्ली बोलेरो आणि रिक्षा फिरविण्याची वेळ आली नसती. आमदार नाईक यांचे राजकारण फक्त भावनेवर अवलंबून आहे. भावनेचे राजकारण करून ते कसेबसे दोन वेळा निवडून आले आहेत. परंतु आता ते दिवस गेले आहेत. भावनेचे राजकारण करून वैभव नाईक या मतदार संघात पुन्हा निवडून येणे अशक्य आहे. मालवण कुडाळ मतदार संघात मच्छीमार, पर्यटन व्यवसायिक, शेतकरी, बागायतदार यांचे  अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तरुणांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीच्या काळात या मतदार संघातील नागरिकांचे प्रश्न हाताळले असते तर आज त्यांच्यावर भावनेचे राजकारण करण्याची वेळ आली नसती. सत्तेची अडीच वर्ष मिळाली होती. तेव्हा तरी एखादा विकास प्रकल्प याठिकाणी ते राबवू शकले असते. याउलट नाईक हे स्थगिती सरकारचा एक भाग असल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटन प्रकल्पांना त्यांनी खीळ बसविल्याचा आरोप केदार झाड यांनी केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3806

Leave a Reply

error: Content is protected !!