बोगस पक्षप्रवेश : उबाठा गटाकडून कॉमेडीची “हास्यजत्रा” ; भाजपा पदाधिकाऱ्यांचा टोला
सुकळवाड मधील प्रवेश दाखवलेल्या “त्या” दोन्ही व्यक्ती उबाठा गटाच्याच ; त्यांच्या प्रवेशाने काहीही फरक पडणार नाही
वैभव नाईक स्वतःलाच फसवून घेत आहेत की कार्यकर्ते त्यांना फसवत आहेत ? अजिंक्य पाताडे, स्वप्नील गावडे यांचा सवाल
मालवण | कुणाल मांजरेकर
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उबाठाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडून बोगस पक्षप्रवेश दाखवले जात आहेत. त्यामुळे वैभव नाईक स्वतःलाच फसवून घेत आहेत की कार्यकर्ते त्यांना फसवत आहेत ? असा सवाल माजी सभापती अजिंक्य पाताडे आणि भाजपाचे गाव कमिटी अध्यक्ष स्वप्नील गावडे यांनी केला आहे. सुकळवाड मधील भाजप पक्षामधून उबाठा गटात दाखवलेल्या प्रवेशावरून अजिंक्य पाताडे आणि स्वप्नील गावडे यांनी हा टोला लगावला आहे. स्वतःचेच कार्यकर्ते भाजप पक्षाचे दाखवून एकप्रकारे कॉमेडीची हास्यजत्रा उबाठा गटाने चालवली आहे, अशा शब्दांत त्यांनी उबाठा गटाची खिल्ली उडवली आहे.
सुकळवाड गावातील भालेकर आणि म्हसकर अशा दोन व्यक्तींचे उबाठा गटात प्रवेश दाखवण्यात आले होते. त्यातील भालेकर हे कायमस्वरूपी उबाठा सोबतच होते. त्यांचा कधीही भाजप पक्षाशी काडीमात्र संबंध नव्हता. तसेच म्हसकर हे लोकसभा निवडणुकीच्या शेवटचे चार दिवस आधी उबाठा गटाला मिलाफ झाले होते. त्यामुळे दोन्ही व्यक्तींच्या प्रवेशाने भाजप पक्षाला काडीमात्र फरक पडत नाही. तरी वैभव नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून खरी माहिती घ्यावी, असा सल्ला अजिंक्य पाताडे आणि स्वप्नील गावडे यांनी दिला आहे.