सिंधुदुर्गातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून “आणणारच” : खा. नारायण राणेंकडून ठाम विश्वास
कुडाळ मालवण मधून निलेश राणे ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार ; लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयात महत्वाची ठरेल
कुडाळ : येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील तिन्ही जागांवर महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून आणणारच, असा ठाम विश्वास माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी कुडाळ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. राज्य शासनाच्या वतीने राबवली जाणारी लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयात मोलाची ठरेल, असेही ते म्हणाले. कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत महायुतीने निलेश राणे यांचे नाव घोषित केले आहे. निलेश राणे यांच्यासारखा आमदार मिळतोय म्हणून येथील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. या निवडणुकीत ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील, असेही ते म्हणाले.
कुडाळ मध्ये सोमवारी महायुतीची बैठक खा. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीनंतर खा. राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी खा. निलेश राणे, शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि. प. अध्यक्ष रणजित देसाई, राजू राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, दादा साईल, दीपक नारकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार नारायण राणे म्हणाले, आम्ही तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणणारच आहोत. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांनी ज्या ५० योजना आणल्या त्यामुळे आपल्या देशाची प्रगती झाली. राज्य सरकारने सुद्धा मागील अडीच वर्षात महाराष्ट्र गतिमान रीतीने विकसित व्हावा यासाठी प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत महायुतीकडून सर्वच चांगले उमेदवार दिले आहेत. राज्यात महायुतीचे सरकार परत येईल असा माझा विश्वास आहे. तर जनहीत, जनकल्याण हे आमचे उद्दिष्ट आहे, असेही नारायण राणे म्हणाले. कुडाळ मालवण मध्ये निलेश राणे सुशिक्षित असून याचा फायदा आपल्याला होईल. खासदार असताना सुद्धा निलेश राणे यांनी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले. त्यामुळे त्यांची जनसामान्यात अप्रतिम लोकप्रतिनिधी म्हणून ओळख आहे. साहजिकच यामुळे ते विजयी होतील, असा विश्वास खा. राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार नारायण राणे यांनी ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले. वैभव नाईक यांनी कुडाळ-मालवणमध्ये काहीही काम केलेले नाही. आज मालवणमध्ये अनेक सुविधा नाहीत. एसटी स्टँडवर स्वच्छतागृह नाही. हे त्यांचे अपयश आहे. वैभव नाईक हे निष्क्रिय आहेत. वैभव नाईक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रोज हजेरी लावायचे मग हे निष्ठावान कसे? असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. आम्ही कधीही कॉन्ट्रॅक्ट घेतले नाही आणि टक्केवारी सुद्धा नाही. ज्याला बोलता येत नाही असा आमदार पाहिजे की लोकसभेत काम केलेला आमदार पाहिजे हे लोकांनी ठरवावे.
राज्य सरकारने राबविलेली माझी लाडकी बहीण योजना निलेश राणे यांच्या विजयात महत्वाची ठरेल. या योजनेचा फायदा लाखो माता भगिनींना झाला आहे. त्यामुळे निलेश राणे यांच्या विजयात हा टर्निंग पॉइंट ठरेल, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. यावेळी मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार लढवायचा नाही, असा निर्णय घेतला, यावर खासदार नारायण राणे म्हणाले की, त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. तर शिवसेनेचे सदा सरवणकर हे आमचे उमेदवार आहेत. आमचा जो युतीचा उमेदवार आहे, त्याचे आम्ही काम करणार, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.