सावंतवाडी हादरली : रात्रीच्या अंधारात युवा नेते विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला !

हल्लेखोराला स्थानिकांनी पकडले ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेने खळबळ

सिंधुदुर्गातल्या दहशतवादाला झारखंडच्या दहशतीची जोड अशोभनीय : पोलिसांनी सखोल तपास करावा : विशाल परब

सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर

सावंतवाडी विधानसभा मतदार संघांच्या निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मळगाव येथील नरकासुर स्पर्धा आटोपून मागे परतत असताना सावंतवाडी मळगाव स्टेशनजवळ विशाल परब यांच्या गाडीवर एका व्यक्तीने बांबूने हल्ला केला. या हल्लेखोराला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. ड्रायव्हरने चपळाईने गाडी बाजूला घेतल्याने विशाल परब हल्ल्यातून बचावले आहेत.

या हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोराने वाऱ्याच्या वेगाने धावत जवळच्या जंगलात नाहीसे होण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या स्थानिक युवकांनी पाठलाग करून हल्लेखोराला बाजूच्या झाडीतून ताब्यात घेतले. संतप्त युवकांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपण झारखंडमधील असल्याचे आणि आपल्याला कोणीतरी हे काम सांगितल्याचे हिंदीतून बोलत कबूल केले. आपल्याला गाडीतून सोडून कोणीतरी इथे सोडत हल्ला करायला सांगितले असल्याचे त्याने स्थानिक युवकांजवळ कबूल केले. जमावाने याची कल्पना पोलिसांना दिली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असणारे विशाल परब यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे हा घातपाताचा प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आपल्या जीवावर कोणीतरी उठले असल्याचे वक्तव्य विशाल परब यांनी वारंवार यापूर्वी अनेकदा केले आहे. परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतली असल्याचे दिसत नाही. सिंधुदुर्गातल्या दहशतवादाला आता झारखंडच्या दहशतीची जोड मिळणार असेल, तर सिंधुदुर्गच्या राजकारणाला हा प्रकार शोभणारा नाही, पोलिसांनी याचा योग्य तपास करावा,  अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर विशाल परब यांनी दिली आहे. कोणी कितीही दहशत माजवली तरी जनतेच्या प्रतिनिधी म्हणून मी निवडणूक लढवण्यापासून परावृत्त होणार नाही, असेही विशाल परब यांनी म्हणत हा राजकीय प्रकार असल्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3835

Leave a Reply

error: Content is protected !!