येणाऱ्या काळात बदनामीच्या अनेक गोष्टी चालू होतील, अफवांचे पेव येईल ; कार्यकर्त्यांनी सावध रहावे
शिवसेनेच्या मेळाव्यात महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचे आवाहन ; धनुष्यबाण निशाणी घराघरात पोहोचवण्यासाठी कामाला लागा
दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाचे केले कौतुक ; कठीण काळात अनेकांनी राणेसाहेबांची साथ सोडली, पण दत्ता सामंत खंबीरपणे पाठीशी
शिवसेनेच्या मेळाव्यात संजय आग्रे, दत्ता सामंत, महेश कांदळगावकर, राजा गावडे यांचा सत्कार ; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुका शिवसेनेचा मेळावा बुधवारी कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालयात माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात श्री. राणे यांनी आपल्या दिलखुलास शैलीत उपस्थितांची मने जिंकली. विरोधकांवर जास्त टीका टिप्पणी न करता मतदार संघांच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपले व्हिजन त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाचे यावेळी त्यांनी कौतुक केले. आपल्याकडे केवळ २० ते २२ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आपला विजय निश्चित आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विरोधकांकडून बदनामीच्या अनेक गोष्टी चालू होतील. अनेक अफवा पसरवल्या जातील. माझ्यात आणि सामंत साहेबांमध्ये काहीतरी झालं, माझ्यात आणि महेश राणेंमध्ये काहीतरी झालं, मी अमुकाला गाडीतून उतरवलं. मी आणि सामंत साहेबांनी हे भोगलं आहे. त्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका. सावध राहून आपली धनुष्यबाण निशाणी घराघरात पोहोचवण्यासाठी कामाला लागा, असे प्रतिपादन निलेश राणे यांनी यावेळी बोलताना केलं.
मालवण तालुका शिवसेनेचा मेळावा बुधवारी संपन्न झाला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना नेते म्हणून निवड झालेल्या संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे यांचा सत्कार करण्यात आला. राजा गावकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी आजपर्यंत तालुका कार्यकर्त्यांच्या सभेला दुचाकीवरून कार्यकर्ते येत होते, मात्र आज तीन वर्षांनंतर मालवण तालुका कार्यकर्त्यांच्या सभेला गाड्यांच्या गाड्या भरून कार्यकर्ते आल्याचे पाहून समाधान वाटले. निलेश राणे आणि दत्ता सामंत हे संघटनेत आल्याने नविन उभारी मिळणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, युवासेना विधानसभा समन्वयक प्रितम गावडे, मधुकर चव्हाण, विश्वास गावकर, सुरेश चौकेकर, दिलीप बिरमोळे, रविना घाडीगावकर, सुधीर साळसकर, स्नेहल बिरमोळे, संतोष कोदे, सुनील घाडीगावकर, संतोष साटविलकर, सुशांत घाडीगावकर, मंदार लुडबे, रत्नाकर जोशी, निलम शिंदे, बाळु नाटेकर, किसन मांजरेकर, उपतालुका प्रमुख पराग खोत, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपजिल्हा प्रमुख नीलम शिंदे, महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, हर्षद पारकर, चंद्रकांत गोलतकर, अल्पेश निकम, युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हा संघटक सोनाली पाटकर, पूनम वाटेगावकर, रूपेश पावसकर, जेरॉन फर्नांडिस, महेश बागवे, छोटू ठाकूर, राजू सावंत, दादा परब, बाळा माने, उमेश बिरमोळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले, दत्ता सामंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले आहेत. त्यांच्या भितीने तीन तीन नाईक माझ्या विरोधात उतरले आहेत. कशाच्या भितीने या खेळी केल्या जात आहेत ? असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित करत कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर मी धनुष्यबाण हाती घेतला आहे. खासदार नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीचीही सुरूवात धुनष्यबाणानेच झाली होती, यामुळे आज त्यांच्याच निशाणीवर मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षात हा मतदार संघ अनेक वर्षे मागे गेला आहे. हा मतदार संघ पाच वर्षात राज्यातील पहिल्या पाच मतदार संघांमध्ये नेऊन पोहचविण्याचे काम मी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी गेल्या काही महिन्यात कोट्यवधी रूपयांचा निधी जिल्हयासाठी उपलब्ध करून दिल्याने काही प्रमाणात कामे झाली आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही या मतदार संघासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र आमदार वैभव नाईक यांची प्रशासनावर पकड नसल्याने निधी असतानाही कामे अपूर्ण राहिली आहेत, असा टोला श्री. राणे यांनी यावेळी लगावला.
आमदार वैभव नाईक यांचा पराभव निश्चीत असल्याने आता अफवांचे पेव फुटतील. आम्हाला त्याची कल्पना आहे. जनतेची कामे केली असती तर अफवा पसरविण्याची आवश्यकता भासली नसती. दत्ता सामंत हे राणे कुटुंबियांच्या घरातील व्यक्ती आहे. त्यांनी कठीण काळातही राणे कुटुंबियांसोबत राहणे पसंत केले. मध्यंतरी त्यांना अनेक ऑफर देण्यात आल्या. अनेक जण त्यांना भेटण्यासाठी गेले. मात्र हा जन्म आपण राणे साहेबांसाठी दिला आहे, त्यामुळे या जन्मात त्यांना सोडणार नाही, असे उत्तर दत्ता सामंत यांनी दिले. असे निष्ठावान सहकारी राणेसाहेबाना मिळाले आहेत, असे ते म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबियांचे घर पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न केला, मात्र नियतीलाच त्यांचे मुख्यमंत्री होणे पसंत नसल्याने त्यांची खुर्ची गेली, त्यांच्या कारकिर्दीत आम्हाला झालेल्या वेदना आम्ही विसरू शकत नाही. आम्हाला अडचणीत आणण्यासाठी त्यांनी सर्वप्रकारचे प्रयत्न केले होते, यामुळे आता निवडणुकीतही खोट्या अफवा पसरविण्यात येतील. यामुळे कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून घराघरात पोहचून घनुष्यबाण निशाणीवर मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. राणे यांनी केले.