वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर जेटी या रस्त्यासाठी उपोषण
मालवण (प्रतिनिधी)
वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर जेटी या रस्त्याची खड्यांमुळे दुर्दशा झाल्याने वेळोवेळी लक्ष वेधूनही रस्त्याच्या डागडुजी व डांबरीकरणा बाबत तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापार्डेकर यांनी मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपोषणाद्वारे लक्ष वेधल्यानंतर श्री. बापार्डेकर यांची सा.बांधकाम उपविभाग मालवणचे उपअभियंता नितीन दाणे यांनी भेट घेऊन तारकर्ली रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामास कार्यारंभ आदेश प्राप्त असून पावसाळा संपताच काम पूर्ण करण्यात येईल, तसेच गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्याने बापार्डेकर यांनी उपोषण स्थगित केले आहे.
तारकर्ली रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा निवेदने सादर करत रस्त्याच्या डागडुजी व डांबरीकरण होण्याबाबत मागणी केली होती तसेच उपोषण व आंदोलनही छेडले होते. मात्र, अद्यापही या रस्त्याच्या डागडुजी बाबत बांधकाम विभागाने कोणतीही कार्यवाही न केल्याने बापर्डेकर यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार काल मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून तारकर्ली रस्त्यावरील खड्यात बसून, कोविडचे नियम पाळून बापार्डेकर यांनी आमरण उपोषण सुरू केले तसेच प्रश्न न सुटल्यास प्रसंगी आत्मदहनही करू असा इशारा दिला.
यावेळी सुरेश बापर्डेकर उपोषणाला पं. स. सदस्यां सौ. मधुरा चोपडेकर, प्रसाद बापर्डेकर ,वैभव सावंत, प्रकाश बापर्डेकर, कुणाल बापर्डेकर, वसंत मोंडकर, महेंद्र चव्हाण, अविनाश राऊळ, गुंडू कांदळगावकर,सौ.गायत्री बापर्डेकर, किशोर कुबल ,संतोष बांदेकर, बाबू टिकम, नेरूरकर, मिथिलेश मीठबावकर, शरद माडये, बाळा पाटकर, नारायण माडये, शिवाजी केळुसकर व अन्य ग्रामस्थानी उपस्थित राहून बापर्डेकर यांची मागणी जाणून घेतली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवणचे उपअभियंता नितीन दाणे यांनी उपोषण कर्ते सुरेश बापार्डेकर यांची भेट घेतली. मालवण वायरी तारकर्ली देवबाग या रस्त्यासाठी बांधीव गटारासह रुंदीकरणाचे रुपये ९३ कोटी २४ लाख किंमतीचे काम मंजूर आहे तसेच विशेष दुरुस्ती अंतर्गत या रस्त्याच्या दुरुस्तीचे एक कोटी साठ लाख किंमतीचे काम मंजूर आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, निविदा प्रक्रियेस ठेकेदारांकडून न मिळालेला प्रतिसाद यामुळे या कामास विलंब झाला मात्र आता रस्त्याच्या दुरुस्ती कामाची निविदा पूर्ण झाली असून ता कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. मात्र सध्या पावसाळा सुरू असल्याने व मजूर उपलब्ध होत नसल्याने पावसाळा संपताच रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण काम सुरू करण्यात येईल, तसेच या रस्त्यावरील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजविण्याचे काम करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अभियंता निखिल दाणे यांनी बापर्डेकर यांना दिल्याने त्यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.