हरी… तू बच्चा आहेस, माझा तंबू उध्वस्त करायला तुला १० जन्म घ्यावे लागतील !

सुदेश आचरेकरांनी ठणकावले ; २०१४ च्या पोटनिवडणुकीत गवंडीवाड्यात ६०० मतांनी तुझा तंबू जमीनदोस्त केलाय हे लक्षात ठेव

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणात भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावर टीका करताना त्यांचा तंबू उखाडण्याचा इशारा दिला होता. त्याला आचरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. असे हरी आले किती आणि गेले किती, मी किसगणतीत ठेवत नाही. हरी खोबरेकर तू बच्चा आहेस. माझा तंबू उध्वस्त करायला तुला १० जन्म घ्यावे लागतील. २०१४ ची पोटनिवडणूक विसरलास काय ? त्यावेळी असाच बरळला होतास. तेव्हा गवंडीवाड्यात ६०० मतांनी तुझा तंबू मी जमीनदोस्त करत तुला तुझी पत दाखवून दिली होती. सुदेश आचरेकर यांच्या नादाला लागणे म्हणजे जागेपणी स्वप्न पाहणे आहे. सुदेश आचरेकरचा तंबू उध्वस्त करणारा अजून जन्माला यायचा आहे. यामुळे दत्ता सामंत यांचा सोडाच पण माझाही नाद खोबरेकर यांनी करू नये, असा टोला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी यांनी पत्रकार परिषदेत लगावला आहे.

भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. आचरेकर बोलत होते. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, दिपक पाटकर, विजय केनवडेकर, आप्पा लुडबे, महेश सारंग, गणेश कुशे, राजू बिडये, मोहन वराडकर, आबा हडकर,
नारायण धुरी, निनाद बादेकर, प्रमोद करलकर, नंदू देसाई, कमलेश कोचरेकर, चंद्रकांत केळूसकर, संदीप मालंडकर, कमलेश कोचरेकर, राज कांदळकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. आचरेकर म्हणाले, माझा व्यवसाय आहे. त्यामुळे मला लाभार्थी होण्याची गरज नाही. पण हरी खोबरेकर हे दररोज रिकामटेकडे ठाकरे सेनेच्या कार्यालयात बसून फक्त राजकीय टिकाटिप्पण करीत असतात. त्या व्यतिरिक्त सध्या कोणत्याही प्रकारचा कामधंदा ते करत नसल्याचे जाणवते. त्यामुळे तेच लाभार्थी वाटत आहेत. तुला भाजप अगर दत्ता सामंत यांच्याकडून लाभ घ्यायचा असेल तर आमच्याकडे रितसर अर्ज कर. आम्ही विचार करून तुला लाभ देण्याचा आवश्यकता भासल्यास आम्ही तुम्हाला रोजगारही उपलब्ध करून देऊ, असाही उपरोधिक टोला श्री. आचरेकर यांनी मारला. मी पाच वेळा नगराध्यक्ष झालेलो आहे आणि गत निवडणुकीत मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्यामुळेच ठाकरे सेनेच्या उमेदवाराला विजयाचा टिळा लागला आहे, हे मालवणची जनता जाणून आहे. यामुळे खोबरेकर यांनी आपल्यामुळे नगराध्यक्ष विराजमान झाला याच्या बाता मारू नयेत. मी अपक्ष निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून विजयी झालेलो आहे. गेल्या पाच वर्षात ठाकरे सेनेचा पालिकेतील प्रताप जनतेसमोर आणल्यामुळे तुम्हाला सळो की पळो करून सोडले होते हे विसरलात काय? असाही सवाल श्री आचरेकर यांनी उपस्थित करीत मी अपक्ष लढलो आणि ताकद दाखवून दिली आहे. तुमच्यात जर धमक असेल तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून लढून दाखवा, तुमचे डिपॉझीट जप्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सध्याची ठाकरे सेनेची गत पहाता होते किती, राहिले किती, शिल्लक किती तर बाकी शुन्य, अशी परिस्थिती तुमची झाली आहे. यामुळे आमचा नाद करण्यापेक्षा आपल्या कुवतीप्रमाणे बोलावे, असाही टोला श्री. आचरेकर यांनी मारला.

मी मालवणच्या जनतेच्या मनावर राज्य केलेले आहे. जनतेच्या सुख:दुखात सहभागी होताना त्यांना हवी ती मदत उभी केलेली आहे. आजही नगरसेवक म्हणून कार्यकाल संपला तरी जनतेच्याप्रती आम्ही आजही नगरसेवक म्हणूनच कार्यरत राहिलेलो आहे. ठाकरे सेनेची माणसे कुठे दिसून येतात काय ते खोबरेकर यांनी तपासावे. मला डिचविण्याचा प्रयत्न केल्यास मी अधिकतेने पेटून उठून काम करणारा कार्यकर्ता आहे. मला अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर आल्या होत्या, मात्र मी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून राहणे पसंत केलेले आहे. मी केलेल्या कामाची यादी ठेवली असती तर खोबरेकर यांना ती वाचतानाही दमायला झालं असतं. कोट्यावधी रूपयांचे सहकार्य आपण गेल्या अनेक वर्षात केलेले आहे. यामुळे मालवणची जनता सुदेश आचरेकर यांना ओळखून आहे, हे खोबरेकर यांनी ध्यानात ठेवावे. आचरेकर यांना अडविण्यास गेलेल्यांची काय गत झाली आहे याची सर्वप्रथम खोबरेकर यांनी माहिती घ्यावी, मी आहे तीथेच आहे त्याच ताकदीने उभा राहिलेलो आहे. यामुळे माझ्यावर बोलताना खोबरेकर यांनी पूर्ण विचार करूनच बोलावे, असेही आचरेकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!