दुध उत्पादकांना सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कटीबद्ध

ओरोस येथील चर्चासत्रात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची ग्वाही

सिंधुदुर्ग जिल्हा बँक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ गोकुळ व भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

जिल्ह्यातील शेतकरी केवळ शेती या व्यवसायावरच अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे हा विचार घेऊन सिंधुदुर्ग बँकेची वाटचाल सुरु आहे. जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात वाढ होण्यासाठी दुध उत्पादनाचे उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्याने आपल्याला पूर्णत्वास न्यायचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक सभासद कर्जदारांवर जिल्हा बँकेने जो विश्वास टाकलेला आहे, तो विश्वास जपणं हे प्रत्येक सभासद कर्जदाराचे कर्तव्य आहे, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ गोकुळ व भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक पतपेढी सभागृह ओरोस येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित दुध उत्पादक शेतकरी यांना मार्गदर्शन करतांना श्री. दळवी हे बोलत होते. आज जिल्ह्यतील दुग्ध उत्पादन २८ हजार लिटर वरून १ लाख लिटर पर्यंत वाढवण्याचा संकल्प बँकेने केलेला आहे. या करीता जिल्हा बँकेने दुधाळ जनावंराच्या खरेदी साठी विविध योजना राबविलेल्या आहेत. तसेच दुध उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीमधुन मार्ग काढण्यासाठी जिल्हा बँक सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षभरात कोकणातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यामध्ये एक सकारात्मक मानसिकता रुजते आहे. याचे दृष्य़ परिणाम आता दुग्ध उत्पादनात झालेल्या वाढीमुळे दिसू लागले आहेत. त्यासाठीच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून जिल्हा बँक विविध प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्रे आयोजित करत असून त्याचा लाभ दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी करून घ्यावा असे आवाहन यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. यावेळी ते पुढे म्हणाले, ६०% दुधाळ जनावरांची दूध देण्याची क्षमता ही त्यांच्या अनुवंशिकतेवर अवलंबून असते. प्रत्येक वेळी एखादे जनावर घ्यायचे असेल तर तो शेतकरी पर राज्यात दूर जाऊन त्याची खरेदी करू शकत नाही यासाठी Animall.in हा डिजीटल प्लॅटफॉर्म आहे. या कार्यक्रमाच्या वेळी Animall Technologies Pvt. Ltd. कंपनीचे बिझनेस हेड डॉ. शिरीष शिरसाट यानी जनावरांची खरेदी विक्री कशाप्रकारे केली जाते त्याचे सादरीकरण केले. तसेच राज्याबाहेरील संकरित दुधाळ जनावरे जिल्ह्यामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी म्हुरा, म्हैसाणा, गीर, जर्सी या गाईंची मोबाईल ऍप द्वारे स्कॅनिंग करुन त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणविशेषांसहीत इच्छुक कर्जदारांना त्यांची माहिती देऊन ती जनावरे थेट कर्जदारांना घरपोच देण्याची सुविधा एनिमल डॉट इन या मोबाईल ऍप द्वारे देण्यात येणार असल्याचे सांगुन भारतातील दुधाळ गाई आणि म्हशींच्या खरेदी विक्रीसाठी हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याचे सांगितले. या ऍपद्वारे एकूण भारतातील एक कोटी २० लाख एवढे विविध क्षेत्रातील शेतकरी तसेच दुग्ध व्यवसायिक जोडले गेलेले असून या सॉफ्टवेअरद्वारे १५ लाखाहून अधिक जनावरे विकली गेल्याचे श्री. शिरसाट यांनी सांगितले. या ऍपद्वारे गाय, म्हैस यांचे मोबाईल स्कॅनिंग द्वारे मूल्यमापन केले जाते. म्हुरा, सेहवाल, गीर, जर्सी, म्हैसाणा अशा विविध गाईंच्या अँपद्वारे स्कॅनिंग करून त्यांच्या जातीच्या वैविध्यासह त्या गाई म्हशी संबंधित खातेदाराला त्याच्या पसंतीने घरपोच दिल्या जातात. या जनावरांच्या त्यांच्या प्रवासातील काळजीही या कंपनीद्वारे घेतली जाते. याबाबतची माहिती दिली.

यानंतर प्रश्नोत्तरांच्या सत्रात दुधाळ जनावरांना उद्भवणारे आजार, त्याची उपाययोजना तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना आणि शंकांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ गोकुळचे डॉक्टर साळुंखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोर्ये, बँकेचे माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगीरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर यांनी केले. सदर प्रास्ताविकात या चर्चासत्राच्या आयोजनाची भूमिका मांडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!