तोंडवळीतील उध्वस्त जेटीची आ. वैभव नाईक यांच्याकडून पाहणी
तातडीच्या उपाययोजनेसाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार
मालवण : तोंडवळी-तळाशील गावाला समुद्री उधणाचा मोठा फटका बसला. यात गणेश पाटील यांच्या रिसॉर्टनजीक समुद्रकिनारी बांधण्यात आलेली जेटीही लाटांच्या तडाख्यात वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी तोंडवळी मधलीवाडी किनारपट्टीची पाहणी केली. किनारपट्टीची होणारी धूप लक्षात घेता सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापनमधून तात्काळ उपाययोजना करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
तोंडवळी मधलीवाडी येथे आमदार वैभव नाईक यांच्या समवेत शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, विभागप्रमुख समीर लब्दे, माजी सरपंच संजय केळुसकर, आबा कांदळकर, खोबरेकर,तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, सदस्या अनन्या पाटील, मानसी चव्हाण, गणेश तोंडवळकर, ज्ञानेश गोलतकर, दीपक कांदळकर, नाना पाटील, गणेश पाटील, शेखर तोंडवळकर, सुभाष पाटकर, विकास पाटील, दशरथ वायंगणकर, आदित्य पेडणेकर, चंद्रकांत गोलतकर तोंडवळी तळाशील मधील ग्रामस्थ तसेच मंडळ अधिकारी अजय परब, तलाठी प्रीतम भोगटे हे उपस्थित होते.
आमदार नाईक यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांना जेटीचा पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. यावेळी आमदार नाईक म्हणाले, तोंडवळी-तळाशीलमध्ये सुमारे ४ कोटींचा धुपप्रतिबंधक बंधारा उभारणीचे काम सुरू आहे. दिवाळीपूर्वी मधलीवाडी येथील जेटीसह बंधाऱ्याचे काम सुरू होईल. त्यासाठी २ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी येणाऱ्या काळात दोन उधणाचा अंदाज घेता किनारपट्टीची धूप होऊ नये यासाठी तात्पुरती उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन बंधारे होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला जाईल. ज्याप्रमाणे तळाशीलवाडीला धुप्रतिबंधक बंधारा बांधून संरक्षण मिळाले, त्याचप्रमाणे तोंडवळी मधलीवाडी येथे वर्षभरात धुप्रतिबंधक बंधारा बांधून उधणात गिळंकृत होणाऱ्या भूभागाला संरक्षण देण्याचा प्रयत्न राहील, असे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.