सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेला मालवणचा मोहरम सण पारंपरिक प्रथेने साजरा

मालवण : सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून ओळखला जाणारा मालवणातील मोहरम ताजिया (ताबूत) मिरवणूक सोहळा शनिवारी मिरवणुकीसह प्रथेप्रमाणे साजरा झाला.

हजरत नुरुद्दीन शाह कादरी मेढा व किल्ले सिंधुदुर्ग येथील मोहरम ताजिया याकडे मालवण वासीयांच्या ऐक्याचे प्रतिक म्हणून पाहिले जाते. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला हा उत्सव म्हणून या सोहळ्याची ओळख आहे. पाच पवित्र आत्म्यांचे प्रतिक म्हजेच ताजिया (ताबूत) मानले जाते.

किल्ले सिंधुदुर्ग येथील मुस्लिम हिंदू बांधव एकत्र येत होडीच्या सहाय्याने ताजिया (ताबूत) समुद्रातून मालवण मेढा पिराची भाटी याठिकाणी आणतात. मेढा येथील मोठा ताबूतही त्यावेळी सजवून असतो. दोन्ही ताजिया (ताबूत) मोहरम मिरवणूक मेढा येथून मालवण बंदरजेटी, बाजारपेठ, भरड मार्गे फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोट मार्गे दर वर्षांप्रमाणे पारंपरिक वाद्यांसाह काढण्यात येणार आहे. तर मेढा राजकोट समुद्र किनारी या ताजीयाचे (ताबूत) रात्री विसर्जन होते. अशी माहिती मेढा येथील मोहरम मानकरी यांनी दिली आहे. मिरवणुकीत दर वर्षा प्रमाणे मालवणातील मुस्लिम व हिंदू बांधव सहभागी झाले होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!