नवीन कुर्ली वसाहतला स्वतंत्र ग्रामपंचायतीची मंजुरी द्या
आमदार नितेश राणे यांची ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी
कणकवली : कणकवली तालुक्यातील पुनर्वसीत नवीन कुर्ली वसाहतसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. तशा पद्धतीचे मागणीचे पत्र आमदार नितेश राणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. यापूर्वीही अनेकवेळा या ग्रामपंचायतीसाठी आमदार राणे यांनी पाठपुरावा केलेला आहे. प्रस्ताव सुद्धा दिलेले होते.
आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या निवेदनात नवीन कुर्ली वसाहतची मागणी करताना म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघातील कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत कुर्ली व घोणसरी या गावातील विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सन १९९५ साली लोरे व फोंडा गावठाण (नवीन कुर्ली) ता. कणकवली या ठिकाणी करण्यात आले. त्याचप्रमाणे “नवीन कुर्ली” हे महसुली गाव म्हणून सन २००२ मध्ये घोषित करण्यात आले. तेव्हापासून “नवीन कुर्ली” पुनर्वसीत गावठाणसाठी नव्याने ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी अनेकवेळा शासन दरबारी केलेली आहे. परंतु अनेकवेळा विविध त्रुटी काढून सदर प्रस्तावास अद्यापपर्यंत मंजूरी देण्यात आलेली नाही. आता परिपूर्ण प्रस्ताव आपल्याकडील ग्रामविकास खात्याकडे पाठविण्यात आला असून सदरहू प्रस्ताव प्रलंबित आहे. तरी “नवीन कुर्ली” वसाहत ग्रामपंचायत स्थापनेच्या प्रस्तावास त्वरीत मंजूरी द्यावी, ही विनंती असे पत्रात आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.