कोण ते पोलीस आयुक्त, स्वतःला छत्रपती समजतात काय ?
केवळ सरकारला खुश करण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करू नका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक पोलीस आयुक्तांना सल्ला
कुणाल मांजरेकर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र त्या वक्तव्यानंतर राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलिसांना हाताशी धरून या प्रकरणात चुकीची कारवाई करत आहे, याचा आम्ही निषेध करतो. संपूर्ण महाराष्ट्र भाजप राणेसाहेबांच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राणेंच्या अटकेचे फर्मान करणाऱ्या नाशिक पोलीस आयुक्तांवर देखील त्यांनी टीका केली आहे. कोण ते पोलीस आयुक्त ? स्वतःला छत्रपती समजतात काय ? एखाद्याला उचलून आणा ? समोर हजर करा, असं म्हणणं सोप आहे का असा संतप्त सवाल फडणवीस यांनी केला आहे. केवळ सरकारला खूश करण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करु नका, असे सांगून कायद्याचा दुरुपयोग करणारे पोलीस अधिकारी आज कुठे आहेत ? याचा विचार करा असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना दिला आहे. महाराष्ट्रात येऊन हिंदूंना शिवीगाळ करणाऱ्या शरजील उस्मानी याला अटक करताना तुमच्यातील मर्दुमकी कुठे गेली होती ? असा सवाल देखील फडणवीस यांनी केला आहे.