अनधिकृत वाळू उपसा रोखण्याची जबाबदारी घ्या ; वाळू व्यावसायिक संघटनेची मागणी

संघटनेकडून प्रशासनास सहकार्य करण्याची ग्वाही ; मालवण मधील बैठकीत निर्णय : जिल्हाध्यक्ष बाबा परब यांची माहिती

मालवण : शासनाने वाळू दर कमी केल्यानंतर नव्याने टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. टेंडर प्रक्रिया होऊन वाळू उपसा होत असताना जर कुठे अनधिकृत वाळू उत्खनन होत असेल तर ते बंद करण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाने घ्यावी. प्रशासनास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका सिंधुदुर्ग जिल्हा वाळू व्यावसायिक संघटनेच्या मालवण येथील बैठकीत घेण्यात आली.

वाळू व्यावसायिक संघटनेची बैठक जिल्हाध्यक्ष बाबा परब यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल सिल्व्हर सॅण्ड येथे गुरुवारी संपन्न झाली. यावेळी प्रमोद मयेकर, साई मडये, पिंटू नाईक, मामा पाटकर, पंड्या कांबळी, बाबी वेतुरेकर, अना हडकर, प्रमोद नाईक, सुमन पोयरेकर यांच्यासह अन्य वाळू व्यावसायिक उपस्थित होते. बैठकीतील निर्णयांची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबा परब यांनी दिली. शासनाकडे लाखो रुपये भरणा करून व्यावसायिक टेंडर घेणार आहेत. अश्या स्थितीत खाडीपात्रातुन अनधिकृत वाळू उपसा व वाहतूक होणार नाही याची जबाबदारी महसूल प्रशासनाने घ्यावी. अनधिकृत वाळू उपसा-वाहतूक होत असल्यास त्यावर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनास कोणतेही सहकार्य लागल्यास वाळू व्यावसायिक संघटना प्रशासनाच्या सोबत राहील. लाखो रुपये टेंडर मध्ये घालून अधिकृत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचा व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!