हॉलमार्किंग युनिकआयडी मधील जाचक अटींविरोधात मालवणात सराफी पेढ्या बंद !

हॉलमार्क कायद्याचे स्वागतच ; मात्र नव्या जाचक तरतुदींना विरोध

अनिल मालवणकर, उमेश नेरूरकर, गणेश प्रभुलकर यांची माहिती

मालवण : केंद्र सरकारच्यावतीने सोन्याच्या दागिन्यांसाठी लागू केलेला हॉल मार्किंग आणि एचयुआयडी मधील जाचक तरतुदी हटवण्यासाठी मालवणमधील सुवर्णकारांनी सोमवारी आपापल्या सराफी पेढ्या बंद ठेवून नव्या कायद्याला प्रखर विरोध दर्शविला आहे. होलमार्क कायद्याचे स्वागतच आहे, मात्र एचयुआयडी मधील जाचक तरतुदी सुवर्णकार आणि ग्राहकांसाठी देखील त्रासदायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया मालवण सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मालवणकर, उपाध्यक्ष उमेश नेरुरकर आणि सचिव गणेश प्रभुलकर यांनी दिली आहे.
ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात एचयुआयडीद्वारे शुद्धता तपासणी पद्धतीमध्ये केलेल्या चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ सुवर्णकारांनी सोमवारी एक दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने (बीआयएस) शुद्धतेचा स्टॅम्प दागिन्यांवर मारण्यासाठी हॉलमार्किंग कायदा अमलात आणला.

देशातील ज्वेलर्सने कायद्याचे स्वागत देखील केले. आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीने होत होती. परंतु, बीआयएसने शुद्धतेच्या ४ प्रमाणित शिक्क्यांमध्ये बदल करीत हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीची चुकीची व असंविधानिक पद्धत आणली. इतकेच नव्हे, तर ही आणत असताना सुवर्णकारांच्या शिखर संस्थांबरोबर चर्चा न करता हे बदल करण्यात आले. सदर पद्धतीमुळे ग्राहकांवर खर्चाचा अतिरिक्त भार पडणार आहे आणि व्यापाऱ्यांनाही पेपर वर्क वाढल्याचा त्रास होणार आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या वतीने सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. या संपाला पाठिंबा देत मालवण सराफ असोसिएशनने देखील सोमवारी सर्व सराफी पेढ्या बंद ठेवल्या. यावेळी सुवर्णकारांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल मालवणकर, उपाध्यक्ष उमेश नेरुरकर, सचिव गणेश प्रभुलकर, नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्यासह दिलीप हिलोस्कर, सिद्धार्थ जामसंडेकर, चंद्रवदन कुडाळकर, प्रसाद धारगळकर, राजेश कुडाळकर, राजा कारेकर, किरण कारेकर, विलास निवेकर, अनंत कुडाळकर, सचिन पेडणेकर, प्रकाश रेवणकर, संजय माशेलकर, सुहास सांगोडकर, शिवराज धामापूरकर, संजय पेंडुरकर, प्रकाश कुडाळकर, किशोर माशेलकर, सचिन पेडणेकर, शैलेश मांलडकर आदींसह अन्य सराफी बांधव उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!