पद्मगड ते सिंधुदुर्ग किल्ला जलमार्गावर प्रवासी वाहतूक उद्देशपत्रातील एक लाखांच्या अनामत रक्कमेची अट शिथिल करा…


भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखालील व्यवसायिकांनी आ. निलेश राणेंचे लक्ष वेधले
मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण दांडी येथील पद्मगड ते सिंधुदुर्ग किल्ला या मार्गावरून किल्ला प्रवासी वाहतूक करण्यासाठी ११ जणांना उद्देशपत्र देण्यात आली आहेत. यामध्ये या व्यवसायिकांना एक लाख अनामत रक्कमेची अट ठेवण्यात आली असून हा प्रकार अन्यायकारक आहे. ही अट शिथिल करण्याच्या मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखालील पर्यटन व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने आमदार निलेश राणे यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित केला असल्याने मालवण बंदर याठीकाणी मालवण बंदरामध्ये दांडी समुद्र किनारी स्कुबा डायव्हींग व जलक्रीडा प्रकार करण्यासाठी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. या जलमार्गावर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मालवण बंदर येथील दांडी जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई कार्यालयात परवानगी मिळणेसाठी प्रस्ताव सादर केलेले होते. त्या प्रस्तावाना मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई कार्यालयाने ११ व्यावसायिकांना पद्मगड (दांडेश्वर मंदिर) ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यास उद्देशपत्र देण्यात आलेले आहे.
प्राप्त उद्देशपत्रामध्ये अटी शर्ती दिलेल्या असून यातील अट क्रमांक ५ ही अट आम्हा सर्वांना मान्य नाही. त्या अटीमध्ये सुरक्षा ठेव रक्कम रुपये १,००,०००/- अक्षरी (एक लाख रुपये मात्र) इतकी रक्कम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई या नावाने उद्देशपत्र निर्गमित केल्याच्या दिनांका पासून एक महिन्याचे आत या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. सदरची सुरक्षा ठेव रक्कम परवानगी करीता आवश्यक वैध कागदपत्रांची पूर्तता केल्यास परत करण्यात येईल. अन्यथा सदरची रक्कम ना-परतावा असेल याची नोंद घ्यावी.
दांडी जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई कार्यालयाने श्रीमती, सुमेधा मेघनाद धुरी, व श्री. विठ्ठल रामदास केळुसकर यांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिलेली असून परवानगी देतेवेळी सुरक्षा ठेव रक्कम रुपये १,००,०००/- अक्षरी (एक लाख रुपये मात्र) इतकी रक्कम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई या नावाने उद्देशपत्र निर्गमित केल्याच्या दिनांका पासून एक महिन्याचे आत या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे, अशी अट त्यावेळी नव्हती म्हणजेच एकाच जलमार्गावर वेळ वेगळे नियम तयार करुन एक लाखाची अट लावून नविन व्यावसायीकांना पर्यटन व्यवसायातून बाजूला करण्याचे धोरण महाराष्ट्र सागरी मंडळाने आखलेले आहे. सर्व व्यावसायीक सुशिक्षित बेरोजगार असून नविन व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेचे कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरु करणार आहेत. त्यात करुन ही अट लादल्यामुळे पुढे व्यवसाय करावा किंवा कसे याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अट क्रमांक ५ ची पुर्तता करणे शक्य होणार नाही. व्यावसायिकांनी सुरक्षा ठेव रक्कम रुपये १,००,०००/- अक्षरी (एक लाख रुपये मात्र) ही लादलेली अट रद्द करुन सुरक्षा ठेव रक्कम कमीत कमीत रुपये ५०००/- ते रुपये १०,०००/- करुन मिळावी. अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

