महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी संस्थाचालक, माजी विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करावेत


स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिरक महोत्सव कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी दत्ता सामंत यांचे प्रतिपादन
मालवण : साठ वर्षापूर्वी लावलेले स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे रोपटे आज वटवृक्ष बनले असून हिरक महोत्सव साजरा करत आहे. या महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी घडविले आहेत. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी संस्था चालक, माजी विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांनी एकत्रित प्रयत्न करत ६१ व्या वर्षात पदार्पण करावे, असे प्रतिपादन उद्योजक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवानिमित्त महाविद्यालयात हिरक महोत्सव कार्यालयाचे उदघाटन दत्ता सामंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे, संचालक साईनाथ चव्हाण, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, डॉ. शशिकांत झाट्ये, भाऊ सामंत, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर धुरी, दयानंद चौधरी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रारंभी गणेश कुशे यांनी प्रास्ताविक करत हिरक महोत्सव आयोजनाबाबत माहिती देत हिरकमहोत्सव कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नारायण राणे यांना निमंत्रित केले असल्याची माहिती दिली. यावेळी दत्ता सामंत यांनी हिरकमहोत्सवासाठी महाविद्यालयाला ५० हजार रुपयांची देणगी जाहीर केली. यावेळी दत्ता सामंत म्हणाले, या महाविद्यालयाने अनेक मोठी व्यक्तिमत्वे घडवली आहेत, अनेक माजी विद्यार्थी आज मोठ्या पदावर काम करत आहेत. हिरक महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थ्यांना एकत्र जोडले पाहिजे. महाविद्यालयासाठी आपण यापुढेही मदत करत राहू, तसेच आमदार निलेश राणे व खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातूनही मदत केली जाईल असेही सामंत म्हणाले. यावेळी बाळासाहेब पंतवालावलकर यांनीही विचार मांडत सर्वांच्या सहकार्यातून हिरकमहोत्सव यशस्वी करूया, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. हंबीरराव चौगले यांनी मानले.

