सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर अनधिकृत एलईडी फिशिंग बोटींचा उद्रेक ; भाजपा कडून कारवाईची मागणी

संबंधित बोटीवर कारवाईसाठी मत्स्यव्यवसाय विभागाने वास्तव अहवाल राज्य सरकारला पाठवावा : भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर

मालवण | कुणाल मांजरेकर

पारंपारीक मच्छिमाराना उध्वस्त करणाऱ्या अनधिकृत एलईडी मासेमारीला केंद्र व राज्य सरकारने बंदी घालूनही सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर निर्विवादपणे एलईडी मासेमारी राजरोस चालू आहे. मंत्री नितेश राणे यांनी या खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर ते पारंपरिक मच्छिमार व्यावसायिकांना अपेक्षित निर्णय घेत आहेत. प्रशासनही चांगली कामगिरी करत आहे परंतु सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर एलईडी फिशिंगचा हा वाढत गेलेला अतिरेक हजारो एलईडी ट्रॉलर समोर आपल्या जिह्यातील यंत्रणेमार्फत रोखणे शक्यच नाही यासाठी जिल्ह्यातील या अनधिकृत फिशिंगचा वाढत चाललेला पारंपरिक मच्छिमारांवर होणारा अन्याय थांबवायचा असेल तर अतिरिक्त मदत आवश्यक असून या बोटीवर कारवाई करण्यासाठी नेव्ही, आर्मी तसेच राज्यातील पोलीस खात्याची मदत घेऊन या अतिरेकी मानसिकतेवर एल ई डी फिशिंग करणाऱ्या बोटींवर संयुक्त कारवाई करावी. तरच हा अतिरेक नष्ट होईल यातूनच पारंपरिक मच्छिमार उभारी घेऊ शकेल, असे निवेदन भाजपाचे मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. कुसवेकर यांना दिले आहे. 

भाजपा मालवणच्या वतीने श्री. कुसवेकर यांची भेट घेऊन वस्तुस्थिती दर्शक अहवाल राज्यसरकारला पाठवावा या विषयी चर्चा केली. त्यावर त्यांनी पुढील दोन दिवसात अहवाल देतो असे सांगितले. त्याच बरोबर अश्या बोटीवर कार्यवाही होणार असे सांगितले. तसेच पर्सनेट नोका बंदी कालावधी असूनही अजून बंदरात ये जा करून अनधिकृत पर्सनेट मासेमारी करतात. त्या नौकांना नोटीस बजावण्याची कार्यवाही करावी अशी मागणी केली. याविषयी विना मानधन तत्वावर काम करण्यासाठी काही संस्था तसेच मच्छिमार एनजीओ तयार असून यांना शासनाची परवानगी मिळण्यासाठीही वरिष्ठ स्तरावरून पाठपुरावा करण्याची मागणी कुसवेकर यांनी मान्य केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्ष अन्वेषा आचरेकर, मिथुन मालंडकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, भाऊ मोर्जे, पांडुरंग पराडकर,सचिन तारी,नारायण धुरी,महेश कोयंडे, सन्मेष परब, संदीप मालंडकर, वसंत गावकर आदिंसह मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव उपस्थित होते, अशी माहिती बाबा मोंडकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4237

Leave a Reply

error: Content is protected !!