चांगला स्पर्श, वाईट स्पर्श यातील फरक मुलींनी वेळीच ओळखणे गरजेचे


भंडारी हायस्कुलमध्ये आयोजित सशक्त नारी, सशक्त समाज या विषयावरील व्याख्यानात डॉ. शुभांगी जोशी यांचे प्रतिपादन
मालवण प्रतिनिधी
आज महिला व लहान मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. स्वतःची सुरक्षितता ठेवणे ही आपलीच जबाबदारी आहे. मुलींनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींकडून होणाऱ्या स्पर्शाबाबत जागरूक राहिले पाहिजे, कोणता स्पर्श चांगला कोणता स्पर्श वाईट हे मुलींनी जाणून घेणे व वेळीच ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मालवणच्या डॉ. शुभांगी जोशी यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रशालेतील सखी सावित्री समितीच्यावतीने सशक्त नारी सशक्त समाज या विषयावर विद्यार्थिनी साठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमास डॉ. सौ.शुभांगी जोशी तसेच डॉ. सौ.गार्गी ओरोसकर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, संस्थेचे लोकल कमिटीचे खजिनदार जॉन नरोना प्रशालीचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे सहाय्यक शिक्षिका सौ.सरोज बांदेकर ,पी.जी. मेस्त्री, सौ.जे व्ही रेवणकर आदीजन उपस्थित होते.
प्रारंभी सौ. बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. तर स्वागत मुख्याध्यापक श्री. तिवले यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना डॉ.जोशी यांनी आपले शरीर ही आपली संपत्ती आहे, शरीरावर कशाही पद्धतीने स्पर्श करण्याचा अधिकारी कोणालाही नाही. एखाद्या स्पर्शामुळे आनंद वाटत असेल, छान वाटतं असेल तर तो चांगला स्पर्श असतो, तर ज्या स्पर्शाने आपल्याला राग येतो, घृणा वाटते, रडू येते.असा स्पर्श वाईट स्पर्श असतो. हे स्पर्श मुलींनी ओळखणे गरजेचे आहे अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. डॉ.सौ. गार्गी ओरोसकर यांनी मुलींच्या समस्या तसेच आहार या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मेस्त्री मॅडम यांनी आभार मानले.

