देशविरोधी घोषणा | मालवण पोलीस ठाण्यात तीन मुस्लिम परप्रांतीयांविरोधात गुन्हा दाखल

दोघांना अटक ; गुन्हा दाखल आरोपींमध्ये एका अल्पवयीन बाल गुन्हेगाराचा समावेश

आरोपींचे वकील पत्र न घेण्याचा मालवण बार असोसीएशनचा निर्णय ; आरोपींना उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार

मालवण | कुणाल मांजरेकर 

भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यावेळी देशाच्या विरोधात घोषणा देत समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मालवण शहरात आडवण येथे वास्तव्यास असणाऱ्या मुस्लिम परप्रांतीय भंगार व्यावसायिकासह तिघांवर मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये किताबुल्ला हमीदउल्ला खान, आयेशा किताबुल्ला खान याच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. याबाबतची तक्रार सचिन वराडकर यांनी पोलिसांत दिली आहे. 

वराडकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आंगणेवाडी यात्रेतून काल रात्री माघारी परतल्यानंतर शहरातील वायरी येथील मित्राकडे जात असताना रात्रौ साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान तारकर्लीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काही मुले उभी होती. भारत पाकिस्तान मॅच दरम्यान त्यातील एक मुलगा हा भारत देशाच्या विरोधात घोषणा देत होता. त्याला याबाबत विचारणा केली असता तो पळून गेला. त्यानंतर तो मुलगा हनुमान मंदिर येथे दिसला. त्याला पुन्हा विचारले असता त्याने आपल्या वडिलांना भेटा असे सांगितले. त्याच्या वडिलांची भेट घेत माहिती दिली असता त्यांनीही देशाच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली. याची माहिती वराडकर याने मित्र हरेश पडते याला दिल्यानंतर घटनास्थळी भाऊ सामंत, संतोष लुडबे, विजय केनवडेकर, अवि सामंत, आप्पा लुडबे, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर यांच्यासह हिंदू बांधव जमा झाले. सर्वांनी त्या भंगार व्यवसायिकांना देशाच्या विरोधात घोषणा देणे योग्य नसल्याचे सांगितले. मात्र त्यानंतरही त्यांनी देशाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांच्या या कृत्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण झाली. या तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4242

Leave a Reply

error: Content is protected !!