निलेश राणेंचा इशारा, अन् झाराप मधील “ती” टपरी काही तासातच जमीनदोस्त !


तरीसुद्धा १२ तारीखला गावात जाणार ; सविस्तर भूमिका उद्या जाहीर करू – निलेश राणेंची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर

मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ झाराप झिरो पॉईंट येथील महामार्गालगत असलेल्या हॉटेलमधील मालकासह त्याच्या कुटुंबीयांनी पर्यटकाला दोरीने बांधून मारहाण केली होती. या निर्दयी मारहाणी नंतर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून संतापाची लाट उसळली होती. सदरची टपरी अनधिकृत असल्याने प्रशासनाने येत्या ४८ तासात ही टपरी स्वतः न काढल्यास मी १२ तारिखला संध्याकाळी गावात जाऊन ती टपरी तोडणार असल्याचा इशारा शिवसेना आमदार निलेश राणे यांनी दिला होता. निलेश राणे यांच्या ईशाऱ्या नंतर काही तासातच पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून ही टपरी जमीनदोस्त करण्यात आली आहे. दरम्यान, ही टपरी प्रशासनाने जमीनदोस्त केली असली तरी येत्या १२ फेब्रुवारीला मी गावात जाणार आहे. याबाबतची सविस्तर भूमिका उद्या ( मंगळवारी) जाहीर करू, अशी माहिती आ. राणे यांनी “कोकण मिरर”शी बोलताना दिली.
झाराप मधील अमानुष मारहाणी बाबत समाजातून संतापाची लाट उसळली होती. याबाबत आमदार निलेश राणे सुद्धा आक्रमक झाले. झाराप झिरो पॉईंट येथील पर्यटकांना मारहाण केली गेलेली अनधिकृत टपरी येत्या २४ तासात काढा. अन्यथा १२ फेब्रुवारी रोजी ही टपरी मी स्वतः येऊन हटवणार असा इशारा आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला देत कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार पोलिस यंत्रणा राहील असेही त्यांनी म्हटले होते. आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला इशारा दिल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यामधून ग्रामपंचायतीला पत्र पाठविण्यात आले. आणि त्या ठिकाणच्या ग्रामसेवकांनी तात्काळ संबंधित मालकाला नोटीस देऊन ही टपरी काढा असे सांगितले. दरम्यान कुडाळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी गेले टपरी मालकाला सांगितले. त्याने ही टपरी काढायला तात्काळ सुरुवात केली. ही अनधिकृत टपरी पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून काढण्यात आली.
दरम्यान, ही टपरी हटवली असली तरी येत्या १२ फेब्रुवारीला मी झाराप गावात जाणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. याबाबत सविस्तर भूमिका उद्या जाहीर करू, असे ते म्हणाले. त्यामुळे उद्या मंगळवारी झाराप मधील त्या मारहाण प्रकरणी निलेश राणे कोणती भूमिका मांडून गावात जाणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

