निलेश राणेंचा करिष्मा ; बहुमत नसतानाही कुडाळ नगरपंचायतीवर शिवसेना महायुतीचा नगराध्यक्ष
महाविकास आघाडीचे एक मत फुटले ; येत्या काळात विकास काय असतो ते दाखवून देऊ : निलेश राणेंची प्रतिक्रिया
कुडाळ | कुणाल मांजरेकर
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी उबाठा आणि महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. या नगरपंचायतीवर बहुमत नसताना देखील शिवसेना भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांनी नगराध्यक्ष पदी एका मताने बाजी मारली. अडीच वर्षानंतर महायुतीला येथे वर्चस्व सिद्ध करता आले. आमदार निलेश राणे यांनी हा विजय महायुतीचा आहे. केवळ विकासासाठीच नगरसेवकांनी आम्हाला मतदान केले, असे सांगून येत्या काळात कुडाळमध्ये विकास काय असतो दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. एकूण १७ सदस्य असलेल्या या नगरपंचायतच्या नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सई काळप यांना ८ मते तर शिवसेना महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांना ९ मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे एक मत फुटले. नगराध्यक्ष निवडीनंतर महायुतीकडून जल्लोष करण्यात आला. आमदार निलेश राणे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचे अभिनंदन केले.