सर्वाधिक लोकसंख्या व महसूल असलेल्या शिरवंडे गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर करावे : ग्रामपंचायतीने आ. निलेश राणेंचे लक्ष वेधले
तलाठी कार्यालयासाठी माजी सभापती सुनील घाडीगावकर यांचा पाठपुरावा ; मात्र वैभव नाईकांच्या गलिच्छ राजकारणामुळे गावावर अन्याय
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील शिरवंडे गाव हा डोंगरी भागात येत असून यापूर्वी असरोंडी, शिरवंडे आणि किर्लोस या तीन गावांसाठी एकच तलाठी ऑफिस होते. मात्र तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी असरोंडी सझा फोडून किर्लोस आणि शिरवंडे या दोन गावांची सझा किर्लोसला नेली. शिरवंडे गावची लोकसंख्या व महसूल या दोन्ही गावांपेक्षा जास्त असतानाही वैभव नाईकांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे शिरवंडे गावावर अन्याय केला आहे. याबाबत माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी पं. स. सभेत ठरावही केला असून केवळ वैभव नाईकांच्या गलिच्छ राजकारणामुळे शिरवंडे गावातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी शिरवंडे गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर करावे, अशी मागणी शिरवंडे सरपंच सौ. चैताली गावकर, उपसरपंच सुरेश गावकर यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शिरवंडे गाव हा डोंगरी भागात येत असून यापूर्वी असरोंडी, शिरवंडे व किर्लोस या तीन गावाचे तलाठी ऑफिस असरोंडीला होते. परंतु माजी आमदार वैभव नाईक यांनी असरोंडी सझा फोडून किर्लोस व शिरवंडे असे दोन गावाची सझा त्यांच्या किर्लोस मधील कार्यकत्यांच्या मागणीमुळे किर्लोसला केली. असरोंडी व शिरवंडे दोन गावामधील अंतर २ किलोमीटरचे होते. आता किर्लोस व शिरवंडे अंतर ७ ते ८ किलोमीटर आहे. शिरवंडेतील लोकांना किर्लोस या ठिकाणी जाण्यासाठी कुठल्याही वाहनाची सोय नसल्यामुळे किर्लोसला जाणे गैरसोयीचे झाले आहे.
शिरवंडे गावाची लोकसंख्या व महसूल या दोन गावांपेक्षा जास्त आहे. असरोंडी गावाचं महसूल उत्पन्न ८२८८/- रुपये आहे. किर्लोस गावचे महसूल उत्पन्न ८२९४/- रुपये आहे. व शिरवंडे गावचे महसूल उत्पन्न २७९७२ /- रुपये एवडे आहे. नियमानुसार शिरवंडे गाव महसुली सझेसाठी पात्र ठरतो. परंतु वैभव नाईक यांनी सुडाच राजकारण करून चुकीच्या पध्दतीने शिरवंडे गाव तलाठी सझेसाठी किर्लोसला जोडून शिरवंडे गावावर अन्याय केला आहे. तरी शिरवंडे गावामध्ये नवीन तलाठी ऑफिस मंजूर करावे. तसे होत नसल्यास पूर्वीप्रमाणे असरोंडी तलाठी सझेला शिरवंडे गाव जोडावा व शिरवंडे गावातील ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी. माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी पंचायत समितीच्या सभेमध्ये तलाठी ऑफिस संदर्भात विषय शिरवंडे गावामध्ये होण्याबाबत विषय मांडला होता व तसा ठरावही केला होता. परंतु वैभव नाईक यांच्या गलीच्छ राजकारणामुळे उपयोग झाला नाही. तरी या विषयाचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा, असे या निवेदनात म्हटले आहे.