महाराष्ट्र आता थांबणार नाही ; सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध !
पालकमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर ना. नितेश राणे यांची प्रतिक्रिया ; सर्वांनी मिळून संधीचे सोने करण्याचे सहकाऱ्यांना आवाहन
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
राज्य शासनाने पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री ना. नितेश राणे यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर ना. राणे यांनी आपल्या एक्स अकाउंट वर पोस्ट करत महाराष्ट्र आता थांबणार नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातील भाजप महायुती सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. माझ्यावर विश्वास ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासासाठी सर्व वरिष्ठ नेत्यांना खूप खूप धन्यवाद. तसेच मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! सर्वांनी एकजुटीने मिळून आपापल्या मिळालेल्या संधीचे सोने करूया, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.