मालवण, कुडाळ आगारासाठी एसटीच्या नवीन ४३ बसेस द्या
आमदार निलेश राणेंची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
कुडाळ मालवण मतदार संघातील राज्य परिवहन महामंडळाच्या कुडाळ व मालवण आगारातील अनेक बस नादुरुस्त आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द करायची वेळ आली आहे. यामुळे शाळकरी मुले व नोकरीनिमित्त प्रवास करणारे नागरीक, महिला वृद्ध यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तरी या प्रश्नांचा गांभीर्यपूर्वक विचार करत मतदार संघातील कुडाळ आगारासाठी किमान २५ तर मालवण आगरासाठी किमान १८ अश्या एकूण ४३ नविन एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.