आ. निलेश राणेंचे दातृत्व ; आरिफ आदम बामणे यांच्यासह कुटुंबाला राणे प्रतिष्ठानकडून आयुष्यभर मेडिकलची मोफत सुविधा
आरिफ आदम बामणे यांनी गेट वे ऑफ इंडिया दुर्घटनेत समुद्रात बुडणाऱ्या ३५ जणांचे वाचवले होते प्राण
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया नजिकच्या समुद्रात एलिफंटा कडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात १३ जणांना प्राण गमावावे लागल्याची दुर्दैवी घटना १८ डिसेंबरला घडली होती. या दुर्घटनेवेळी आरिफ आदम बामणे यांनी स्वतःच्या बोटीतून घटनास्थळी जाऊन ३५ जणांचे प्राण वाचवले. याबद्दल शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी आरिफ आदम बामणे यांना आपल्या अंधेरी येथील कार्यालयात बोलावून त्यांचा सत्कार केला. केवळ या सत्कारावर न थांबता राणे प्रतिष्ठानच्या वतीने आरिफ यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर मोफत मेडिकल सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय निलेश राणे यांनी घेतला आहे.
गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळापासून सुमारे १८ मिनिटांच्या अंतरावर स्वतःची बोट घेऊन असलेल्या आरिफ आदम बामणे यांनी हे अंतर केवळ आठ मिनिटात पार करून शासकीय मदत पोहोचण्यापूर्वी ३५ जणांना रेसक्यू करून त्यांचे प्राण वाचवले. या घटनेनंतर आरिफ यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक झाले. त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करून फोटोसेशन करण्यात आले. पण कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी एक पाऊल पुढे जाऊन आरिफ यांच्या धाडसाचे कौतुक म्हणून त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर राणे प्रतिष्ठान कडून मोफत मेडिकल सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू, जिल्हाध्यक्ष बिलाल शेख आणि उपाध्यक्ष इम्तियाज अली शेख उपस्थित होते. निलेश राणे यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.