मालवण बंदर जेटीवरील वाहनतळाची प्रवेशद्वारे बंद केल्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान
मालवण व्यापारी संघाने वेधले आ. निलेश राणे यांचे लक्ष ; प्रत्यक्ष पाहणी करून बंदर विभागाला आदेश द्या : उमेश नेरुरकर यांची मागणी
मालवण : मालवण शहराच्या मुख्य बाजारपेठेच्या तिन्ही गल्ल्यामधे सध्या माल वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या बंदर विभागाने बाजारपेठ किनारपट्टीवर उभारलेल्या वाहनतळाची बाजारपेठेत उघडणारी सर्व प्रवेशद्वारे बंद करून फक्त बंदर धक्क्यावरील एकच प्रवेशद्वार सुरू ठेवले आहे. यामुळे व्यापारी वर्गाची गैरसोय होत असून या समस्येकडे मालवण व्यापारी संघाने आमदार निलेश राणे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. याबाबत आपण स्वतः वाहनतळाची प्रत्यक्ष पाहणी केल्यास विषयाचे गांभीर्य अधिक स्पष्ट होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.
बंदर जेटीवरील मार्ग बंद केल्यामुळे आता मुख्य बाजारपेठेत मालगाड्या प्रवेशच करू शकत नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांना दूरवर मालाचा ट्रक उभा करून हातगाडीने आपला माल दुकानात आणावा लागत आहे. परिणामी वाहतूक खर्चाच्या दुप्पट तिप्पट अतिरिक्त हमालीचा भुर्दंड व्यापाऱ्यांना भरावा लागत आहे. समुद्र किनाऱ्यावरून बाजारपेठेत शिरण्यासाठी जोवर स्थायी स्वरूपाचा रस्ता किंवा बंधाऱ्याची निर्मिती होत नाही, निदान तोवर तरी वाहनतळाची सर्व प्रवेशद्वारे पुर्वी प्रमाणेच उघडी करून मिळावीत. आमच्या या विनंतीचा सकारात्मक विचार करून आपण कृपया बंदर विभागास तसे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.