आ. निलेश राणेंच्या आढावा बैठकीचा “इम्पॅक्ट” ; काही तासातच मालवणातील रंगीत कारंजा पूर्ववत

मालवण नगरपालिका प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही ; नागरिकांतून समाधान

मालवण | कुणाल मांजरेकर

निलेश राणे यांची आमदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी मालवण नगरपालिकेला भेट देऊन शहर विकासाबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी आता आमदार बदललाय, विकास कामात हलगर्जीपणा चालणार नाही, अशी समज निलेश राणे यांनी पालिका प्रशासनाला दिली होती. या बैठकीचे इम्पॅक्ट बैठकीच्या काही तासातच दिसून आले आहेत. गेले काही महिने बंद असलेला फोवकांडा पिंपळ येथील रंगीत कारंजा प्रशासनामार्फत तातडीने कार्यान्वित करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार निलेश राणे यांनी काल मालवण नगरपालिकेला भेट देऊन प्रशासकीय आढावा बैठक घेतली होती. यावेळी आजची पहिलीच बैठक असल्याने आपण जास्त काही बोलणार नाही. मागील दहा वर्षात काय झालं ते झालं. पण आता आमदार बदललाय, त्यामुळे विकास कामात हयगय चालणार नाही. असा इशारा निलेश राणे यांनी दिला होता. या बैठकीत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मालवण फोवकांडा पिंपळ येथील रंगीत कारंजा कित्येक महिने बंद असल्याकडे लक्ष वेधत पालिका प्रशासनाच्या कारभारा बाबत नाराजी व्यक्त केली होती.

फोवकांडा पिंपळ येथे मालवण नगरपरिषदेचे गार्डन आहे. या गार्डनचे सुशोभीकरण करण्यात येऊन यामध्ये रंगीत कारंजा, डेकोरेटिव्ह लाईट बसविण्यात आल्या. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे गार्डन असल्याने पर्यटनदृष्ट्या शहराचे सौंदर्य वाढवणारे आहे. मात्र हेच गार्डन समस्याग्रस्त असल्याकडे महेश कांदळगावकर यांनी लक्ष वेधले होते. हा मुद्दा आढावा बैठकीत उपस्थित होताच पालिका प्रशासनाने तातडीने काही तासातच याची दुरुस्ती करून हा रंगीत कारंजा सुरु केला आहे. याबाबत गेले काही महिने सातत्याने मागणी होत होती. मात्र आमदार निलेश राणे यांच्या आढावा बैठकीत हा विषय उपस्थित होताच काही तासातच त्यावर कार्यवाही झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3975

Leave a Reply

error: Content is protected !!