उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा… ; आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका
नितेश राणेंच्या मंत्रीपदाच्या शपथेनंतर आ. निलेश राणेंचा ठाकरेंना सल्ला
देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रामाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो
मालवण | कुणाल मांजरेकर
राज्य मंत्री मंडळाचा विस्तार आज नागपूर मध्ये पार पडला. यावेळी कोकणचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचे कणकवली मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले सुपुत्र आ. नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राणेंचे ज्येष्ठ सुपुत्र आमदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या एक्स अकाउंट वरून टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा, असं सांगून देव काही काळ परीक्षा घेतो. पण नंतर जो प्रामाणिक आहे, त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते. पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
आपल्या एक्स अकाउंट वरील पोस्ट मध्ये आमदार निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा… आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो. कारण पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठीण होईल, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.