“गाव तेथे शिवसेना” शाखा बांधणी होणार : गाव ठरवेल तोच होणार “शाखाप्रमुख”

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती ; शाखाप्रमुख निवडीसाठी आ. निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली गावागावात होणार बैठका 

महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर आ. निलेश राणे यांचा विजय ; प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यावर भर

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर आमदार निलेश राणे यांचा विजय झाला आहे. मागील दहा वर्षे हा मतदार संघ विकासापासून दूर राहिलेला होता. विकास कामे पूर्ण करण्याची धमक आमदार निलेश राणे यांच्यातच असल्याने जनतेने विकासाचा दृष्टिकोन नजरेसमोर ठेऊन निलेश राणे यांना संधी दिली असून मतदार संघातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यावर आमचा भर राहणार आहे. येत्या काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गाव तेथे शिवसेना शाखा बांधणी करण्यात येणार आहे. गावागावात पक्ष संघटनेची बैठक आयोजित करून गाव ठरवेल त्यालाच शास्त्राप्रमुखपद देण्यात येणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच कुडाळ मालवण मतदार संघातील प्रत्येक गावात या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.

कुंभारमाठ येथील निवासस्थानी श्री. सामंत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दिपक पाटकर, विनायक बाईत, निलेश बाईत, प्रशांत परब, आकाश परब, जयेश घाडी, संतोष साटविलकर, मकरंद राणे, सदा नाईक, संतोष कोदे, जेरॉन फर्नाडीस, राजू देसाई, सुशांत घाडीगावकर, राजन माणगांवकर, सचिन धुरी, दिपक सावंत, गुरु घाडीगावकर, बंड्या पडवळ, बाळा वेंगुर्लेकर, रामा राऊळ, नंदु आंगरी, मिहीर राणे, प्रकाश परुळेकर, संतोष मिराशी, अजित घाडी, प्रकाश कासले, प्रकाश किर्लोस्कर, वैभव पाटकर, राजु राठिवडेकर, प्रफुल्ल प्रभू, केशव परब, चंद्रकांत झारंगे, अनिल सुकाळी, गोविंद चव्हाण, बाळा राऊत, गुरुदास घाडी, प्रशांत पडवळ, काशिनाव चव्हाण, गणेश चव्हाण, संजय ठाकूर, बाबु परब, पुरुषोतम शिंगरे, सुर्यकांत चव्हाण, महादेव चव्हाण, अविनाश चव्हाण, विजय चव्हाण, मंदार लुडबे आदी उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षात मालवण कुडाळ मतदार संघ विकासाकामांमध्ये मागे राहिला आहे. नारायण राणे यांच्या पराभवानंतर या मतदार संघात विकासनिधीच कमी प्रमाणात आल्याने गावागावातील रस्ते, साकव, पाण्याचे प्रश्न तसेच इतरही अनेक कामे प्रलंबित राहिलेली आहेत. प्रचारादरम्यान सर्व गावातील जनतेकडून या प्रश्नांसाठी सातत्याने आमच्याकडे सहकार्य मागण्यात आले आहे. आम्ही जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिलेले आहे. यामुळे आमदार नीलेश राणे हे सदरच्या प्रश्नांसाठी निधी उपलब्ध करून घेऊन जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार आहेत, गावागावातून कामांची माहिती उपलब्ध होत असल्याने आता जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही कार्यरत होणार आहोत, असेही श्री. सामंत म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हयातील तीन्ही मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने जनतेने महायुतीला आशिर्वाद दिलेला आहे. माझ्या विभागातील दोन्ही मतदार संघात जनतेने भरभरून मते दिली आहेत. यामुळे नीतेश आणि नीलेश राणे हे दोघेही विजयी झालेले आहेत. मालवण कुडाळ मतदार संघावर शिवसेनेचा धनुष्यबाण फडकला आहे. तसेच सावंतवाडी मतदार संघातही दिपक केसरकर यांनी विजयाचा चौकार मारला आहे. यामुळे आम्ही जनतेच्या प्रती ऋणी असून सिंधुदुर्गाच्या विकासाचे स्वप्न खासदार नारायण राणे यांनी ज्या पद्धतीने पाहिलेलं आहे, ते पूर्ण करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही श्री. सामंत म्हणाले.

मालवण कुडाळ मतदार संघातील सर्व गावांमध्ये शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकांमध्ये गावातील समस्य आणि त्यावर उपाययोजना तसेच शाखाप्रमुख आणि संघटनाबांधणीमध्ये कार्यकर्ते व ग्रामस्थांचे विचार विचारात घेऊन पदाधिकारी नियुक्ती करण्यात येणार आहे. आगामी निवडणूका लक्षात घेत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही श्री. सामंत म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3971

Leave a Reply

error: Content is protected !!