उद्धव ठाकरेंचाच विश्वास नसलेल्या वैभव नाईकांवर जनता विश्वास कसा ठेवणार ?
कुडाळ – मालवणमध्ये निलेश राणेंचा एकतर्फी विजय निश्चित : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा विश्वास
प्रचारात गावागावातून निलेश राणे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद : मतदार संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी जनताच इच्छूक
मालवण : माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी नावारूपाला आणलेला कुडाळ मालवण मतदार संघ मागील दहा वर्षात भकास करण्याचे काम विद्यमान आमदाराने केले आहे. नजिकच्या सावंतवाडी आणि कणकवली मतदार संघात कोट्यावधींचा निधी येत असताना दहा वर्षांपैकी साडेसात वर्षे सत्ताधारी आमदार असलेल्या वैभव नाईक यांना मतदार संघात निधी आणणे शक्य झाले नाही. वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्या सारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केल्याने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांचा मंत्री मंडळात समावेश करणे आवश्यक होते. मात्र त्यांची कुवत नसल्याने दीपक केसरकर, उदय सामंत यांना त्यांनी मंत्री करून जिल्ह्याचे पालकमंत्री बनवले. त्यामुळे पक्षप्रमुखांचाच विश्वास नसलेल्या वैभव नाईकांवर जनता विश्वास कशी ठेवणार ? यामुळेच यंदाच्या कुडाळ मालवण निवडणुकीत प्रचारात महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गावागावातून प्रतिसाद मिळाला असून या निवडणुकीत जनता मतदार संघाच्या विकासासाठी निलेश राणे यांना एकतर्फी निवडून देईल, असा विश्वास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी व्यक्त केला आहे.
1990 पासून मालवण तालुक्याचे नेतृत्व नारायण राणे करीत आहेत. 2009 पासून कुडाळ मालवण मतदार संघ अस्तित्वात आल्यानंतर या दोन तालुक्यांना नारायण राणे यांचे नेतृत्व मिळाले. त्यामुळे हा मतदार संघ राज्यात नावारूपाला आला. राणे साहेबांचा मतदार संघ असल्याने अधिकारी देखील न मागता या ठिकाणी निधी देत होते. मात्र 2014 मध्ये राणे साहेबांचा येथून पराभव झाल्याने या मतदार संघाला उतरती कळा आली. राणेसाहेबांचा झालेला पराभव संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्यकारक होता. येथील विजयामुळे वैभव नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा महाराष्ट्रात झाली. नारायण राणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून आमदार बनलेल्या वैभव नाईक यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तत्कालीन शिवसेनेच्या वतीने मंत्रिमंडळात स्थान देतील अशी अपेक्षा येथील शिवसैनिकांना होती. मात्र पहिल्या पाच वर्षात उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांच्यापेक्षा सावंतवाडीचे आमदार असलेल्या दीपक केसरकर यांच्यासारख्या अभ्यास व्यक्तिमत्त्वाची मंत्री पदासाठी निवड केली. नारायण राणे यांच्यासारख्या दिग्गजाचा
पराभव करूनही वैभव नाईक यांना साधे महामंडळ देखील देण्याचे सौजन्य उद्धव ठाकरे यांनी दाखवले नाही. यानंतर 2019 साली झालेल्या कुडाळ मालवणच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांच्यासमोर निवडून येताना वैभव नाईक यांची दमछाक झाली. यावेळी तर महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री बनले. यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांच्यावर अविश्वास दाखवला. रत्नागिरीच्या उदय सामंत यांना मंत्रीपदी संधी देत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांना देण्यात आले. यावेळी देखील वैभव नाईक यांना मंत्री पद सोडाच महामंडळ देखील उद्धव ठाकरे यांनी दिले नाही. कारण वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच विश्वास नसल्याने जाणीवपूर्वक त्यांना बाजूला ठेवण्यात आले. साडेसात वर्षांच्या सत्ता काळात वैभव नाईक यांना मतदार संघाच्या विकासासाठी आवश्यक निधी देखील आणता आला नाही, हे सत्य कोणीही नाकारू नये. त्यामुळे ज्या व्यक्तीवर त्यांचाच पक्षप्रमुख विश्वास ठेवत नाही त्या व्यक्तीला येथील मतदारांनी पुन्हा संधी द्यायची का ? असा सवाल उपस्थित झाला आहे. मागील दहा वर्षात येथील मतदारांनी वैभव नाईक यांना पुरेपूर संधी दिली. मात्र या संधीचा मतदार संघाच्या विकासासाठी फायदा करून घेण्यात ते अपयशी ठरले. या दहा वर्षात वैभव नाईक यांची संपत्ती वाढली. पण मतदार संघ भकास झाला. विधान भवनातला सिक्युरिटी गार्ड देखील वैभव नाईक हे आमदार आहेत हे ओळखू शकत नाही. आमदारकीच्या दहा वर्षात केवळ मंत्र्यांना भेटून निवेदनाचे फोटो काढणे या व्यतिरिक्त त्यांनी कोणतेही काम केले नाही. आज कुडाळ मालवण मतदार संघ विकासापासून कोसो दूर गेला आहे. दाखवण्यासारखे एकही विकासकाम आज वैभव नाईक यांच्याकडे नाही.
त्या उलट मागील तीन ते चार वर्षे माजी खासदार निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदार संघात कार्यरत आहेत. निलेश राणे यांनी मनात आणले असते तर राज्यसभा अथवा विधान परिषदेवरून खासदार किंवा आमदार होऊ शकले असते. मात्र ज्या मतदारसंघात स्वतःच्या वडिलांचा पराभव झाला, तो डाग पुसण्यासाठी कुडाळ मालवण मधूनच आमदारकीला उभे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघात सुमारे साडेसहाशे कोटींचा निधी निलेश राणे यांनी आणून दाखवला. सत्तेचे कोणतेही पद नसताना या माणसाने आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर प्रत्येक गावागावात एक तरी काम नेण्याचा प्रयत्न केला आहे. उद्या हा माणूस येथून आमदार झाला तर निश्चितपणे कुडाळ मालवण मतदारसंघ राज्यातील पहिल्या पाच मतदारसंघात आणणार यामध्ये शंका नाही. मागील वीस ते पंचवीस दिवस निलेश राणे यांचा प्रचार सुरू आहे. या प्रचारात गावागावातून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून उद्धव ठाकरे शिवसेनेतून अनेक जण निलेश राणे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन भाजपा, शिवसेना महायुतीत दाखल होत आहेत. या मतदार संघाला पुढे देण्यासाठी निलेश राणे यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज आता जनतेलाही समजली असून येत्या बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदार शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून निलेश राणे यांना प्रचंड मतांनी विजयी करतील. हा विजय महाराष्ट्रात आगळावेगळा असेल. किमान ५० हजार मताधिक्याने निलेश राणे यांचा विजय निश्चित असल्याचे अशोक सावंत यांनी सांगितले.