Aachara : दागिने चोरीप्रकरणी दोन अज्ञात संशयितांवर गुन्हा दाखल ; आरोपी अजूनही मोकाट
ठसे तज्ञाकडून तपासणी ; गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीची माहिती घेण्याचे काम सुरु
आचरा : आचरा बाजारपेठ येथील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून १७ ग्रॅम सोन्याच्या वस्तूंवर डल्ला मारून पळ काढणाऱ्या दोन अज्ञात संशयितांवर आचरा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दागिने चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी ठसे तज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले होते. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती आचरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्याला २४ तास उलटून गेले आहेत. आरोपींच्या चेहऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून देखील अद्याप त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
आचरा बाजारपेठ येथील अरुण गणेश कारेकर यांच्या साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात बुधवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्ती दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आले होते. सुवर्णकार वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने दाखवत असताना त्यांनी हातचलाखी करत सुमारे १ लाख २६ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. काहीवेळाने कारेकर यांच्या चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यावर संशयितांची शोधाशोध करून पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, संशयित चोरटे हे दुचाकीवरून आले होते. त्यांनी या गुन्ह्यात निळ्या रंगाची होंडा कंपनीची एसपी शाईन दुचाकी वापरल्याचे सीसीटिव्हीत कैद झाली असून त्यांनी मालवणच्या दिशेने पळ काढल्याचे पोलिसांना सांगितले.
त्या संशयितांकडून बाजारपेठेतील एका किराणा दुकानातून काही वस्तू खरेदी बहाणा करताना संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. त्यावेळी त्यांना रोखले गेले असते तर चोरीची घटना टाळता आली असती. यापुढे संशयास्पद हालचाल, आपत्कालीन स्थितीत उद्भवल्यास किंवा चोरी, अपघात, हल्ले यासारखे प्रकार घडल्यास पोलीस प्रशासनाच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ११२ वर कॉल आल्यावर अवघ्या काही मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहचतील, असे आवाहन पोवार यांनी केले.