अभिमानास्पद ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ; केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार
आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस : देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
प्रत्येक मराठी मनाची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण करत पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राला मोठी भेट : खा. नारायण राणे
मराठी माणसासाठी जिव्हाळ्याच्या विषयाची दखल आणि निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक आभार : निलेश राणे
मुंबई : केंद्र सरकारने मराठी भाषेला दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यिकांना प्रोत्साहन देणारा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारने मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची माहिती दिली. आमच्याकडे आतापर्यंत ज्या नोटिफाईड अभिजात भाषा होत्या. त्यात कन्नड, तेलुगु, मल्याळम होत्या. नव्या भाषेसाठी प्रस्ताव आला. फ्रेम वर्कमध्ये त्या बसल्या आणि त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आता ज्या नव्या भाषा येतील त्यांनाही याच फ्रेमवर्कमध्ये बसवलं जाणार आहे, अशी प्रतिक्रिया अश्विनी वैष्णव यांनी दिली.
खा. नारायण राणे, निलेश राणे यांनी मानले आभार
खासदार नारायण राणे यांनी देखील याबाबत आपल्या एक्स अकाउंट वरून प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनाची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण करत मोदी सरकारने महाराष्ट्राला मोठी भेट दिली आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार व महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. तर माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महत्त्वाच्या आणि मराठी माणसासाठी जिव्हाळ्याच्या विषयाची दखल आणि निर्णय घेतल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक आभार मानत असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने मनापासून आभार : देवेंद्र फडणवीस
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.