सिंधुदुर्गातील उद्योजकांना बळकटी मिळणार ; भारत सरकारचे कोकण – गोव्यातील पहिले आधुनिक प्रशिक्षण केंद्र होणार सिंधुदुर्गनगरीत !

केंद्रीयमंत्री ना. नारायण राणेंच्या हस्ते सोमवारी ११ मार्चला पायाभरणी समारंभ ; दरवर्षी १० हजार नवउद्योजकांना प्रशिक्षण मिळणार

प्रशिक्षण केंद्रावर १६५.२८ कोटींचा खर्च ; एमएसएमई संचालक पी. एम. पार्लेवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती

ओरोस | कुणाल मांजरेकर

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून एमएसएमई विभागाचे प्रौद्योगिक केंद्र सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे साकारत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन उद्योजकांना घडवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारचे कोकण आणि गोव्यातील हे पहिले आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्र असून या प्रशिक्षण केंद्रावर १६५.२८ कोटी रुपये भारत सरकार खर्च करणार आहे. पीएम विश्वकर्मा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आज देशभर राबविली जात असताना या योजनेला आणखी बळकटी देण्यासाठी सिंधुदुर्गातील तरुण तरुणींना आधुनिक प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सोमवार दि. ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती एमएसएमई संचालक पी. एम. पार्लेवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत शनिवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला एमएसएमईचे सहाय्यक संचालक राहुलकुमार मिश्रा, सौ. सुप्रिया वालावलकर आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नांनी केंद्र सरकारकडून हे तांत्रिक केंद्र मंजूर झाले आहे. ११ मार्च रोजी नारायण राणे यांच्या हस्ते याचा पायाभरणी समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे अपर सचिव तथा विकास आयुक्त डॉ.रजनीश, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 

या आधुनिक प्रशिक्षण केंद्रात इंडो जर्मन दर्जाचे अद्यावत प्रशिक्षण केंद्र होत आहे. दहावी, बारावी पासून उच्चशिक्षित उमेदवारांना प्रशिक्षणाचे प्रवेशद्वार खुले होणार आहे. उमेदवारांना या ठिकाणी निवासी प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेला पाठपुरावा व घेतलेल्या मेहनतीमुळे या ठिकाणी राज्य शासनाने जमीन उपलब्ध करून दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे  सिंधुनगरीतील नवनगर प्राधिकरण कार्यक्षेत्रात प्लॉट क्रमांक ८३ ए  हा २० एकरचा भूखंड या प्रशिक्षण केंद्रासाठी उपलब्ध झाला आहे. केंद्र सरकारचे उद्योग मंत्रालय या केंद्रावर पूर्ण खर्च करणार आहे. या प्रशिक्षण केंद्राचा फायदा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील नव उद्योजक बेरोजगारांना होणार आहे असा विश्वास श्री पार्लेवार यांनी व्यक्त केला आहे.

“नवीन तंत्रज्ञान केंद्रे/विस्तार केंद्रांची स्थापना” या योजनेअंतर्गत MSME मंत्रालयाने स्थापन केलेल्या २० तंत्रज्ञान केंद्रांपैकी सिधुदुर्ग, महाराष्ट्र येथील तंत्रज्ञान केंद्र हे एक आहे. तंत्रज्ञान केंद्राची उभारणी अंदाजे रु. १६५.२८कोटी रुपये खर्चून केली जात आहे. हे तंत्रज्ञान केंद्र सामान्य अभियांत्रिकी क्षेत्रात विकसित केले जात आहे आणि ते पाणलोट क्षेत्रात प्रबळ असलेल्या अन्न क्षेत्राच्या गरजा देखील पूर्ण करेल. प्रशिक्षण केंद्र ही अशी सुविधा असेल जी तंत्रज्ञान सहाय्य कुशल मनुष्यबळ आणि सल्लागार क्षेत्रातील उद्योगांच्या गरजा पूर्ण करेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याला सेवा देण्याबरोबरच, ते रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर इत्यादी लगतच्या भागांच्या गरजा देखील पूर्ण करेल ज्यामुळे उद्योजकांची स्पर्धात्मकता वाढेल आणि क्षेत्रातील रोजगार आणि बेरोजगार तरुणांना कौशल्य सेवा प्रदान करेल.यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील तरुणांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनून रोजगार मिळवता येईल.औद्योगिक क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल बनवण्याचा उद्देश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तंत्रज्ञान केंद्र उभारल्यास तरुणांना नोकरीच्या संधी मिळण्यास आणि शहरात न राहता कमाई करण्यास मदत होणार आहे. या कालावधीत सिंधुदुर्ग आणि आसपासच्या भागातील लोकांना मंत्रालयाच्या पीएम विश्वकर्मा योजनेची माहिती व्हावी यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे. यातून लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास होईल. 

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योगांचा विकास करून जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यमान आणि संभाव्य उद्योजकांना एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजनांबद्दल तसेच त्यांना सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेची जाणीव करून देणे आणि योजनेचा लाभ घ्यावा यासाठीही उद्योग मंत्रालयाचे प्रयत्न आहेत, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3276

Leave a Reply

error: Content is protected !!