उद्धव ठाकरे… रमेश मोरे, जया जाधव यांची हत्या का झाली, हे सांगू शकाल का ?
राजापूरच्या सभेत नारायण राणेंचा सवाल ; इतरांच्या कुटुंबावर बोलताना भान ठेवण्याचा सल्ला
“खोके खोके” काय करता ? आम्ही “खोके” दिले नसते तर पहिली मातोश्री तरी उभी राहिली असती का ?
राजापूर | कुणाल मांजरेकर
मोदी@9 महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तोफ सोमवारी राजापूरात धडाडली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवताना अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुटुंबावरून केलेल्या टिकेचा चोख समाचार घेतला. मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की, तुम्ही आमच्या देवेंद्रजींच्या परिवाराबद्दल बोलता. मग रमेश मोरे आणि जया जाधव यांची हत्या का झाली, हे सांगाल का? हे सांगण्याची नैतिकता तुमच्यात आहे का? हा प्रश्न उद्धव ठाकरेच्या घरातील आहे. उद्धव ठाकरेंच्या घरातील अंतर्गत प्रश्न असल्यामुळे आमचा सोबती रमेश मोरे आणि जया जाधव गेला. याला कारण हेच लोक आहेत. आपल्या कुटुंबाबद्दल जरा कुठे काही कळलं की त्याची नकळत हत्या करतात. उद्धव ठाकरे स्वत: हत्या करत नाहीत. ते हत्या हा शब्दही उच्चारत नाहीत, पण त्यांचे इशारे समजण्या सारखे असतात, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खूप सहनशील नेते आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांचं ते पिल्लू अनेकवेळा खोके खोके म्हणून त्यांच्यावर टीका करतात. पण ते गप्प आहेत. वास्तविक खोके खाऊन खाऊनच मातोश्रीवरचे बोके झाले आहेत. आम्ही खोके दिले नसते तर दुसरी सोडा, पहिली मातोश्री देखील उभी राहिली नसती. आम्ही बॅग आणि प्लास्टिक पिशव्यातून अमृत आणून देत होतो काय ? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जाहीर सभा राजापूर येथे पार पडली. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार, अभियानाचे राज्य प्रमुख प्रवीण दरेकर, आ. नितेश राणे, अतुल काळसेकर, प्रमोद जठार, राजन तेली, बाळा माने, अजित गोगटे, मनिष दळवी, दीपक पटवर्धन यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी ना. राणे म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०३ जागांवर विजय मिळवला. उर्वरित १४४ जागांवर आपला उमेदवार विजयी झालेला नाही. त्यामुळे यातील किमान निम्म्या जागांवर विजय मिळवणे आपले ध्येय असून त्यासाठीच मोदी@9 महाजन संपर्क अभियान राबवले जात आहे. येणारी निवडणूक महत्वाची आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण दोन निवडणुका जिंकल्या आहेत.या ९ वर्षात मोदीजींनी प्रगतशील देश म्हणून आपला देश नावारूपाला आणला. आज जागतिक अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावर असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर येईल. भारत हा आत्मनिर्भर देश बनवावा, हे मोदीजींचे स्वप्न आहे. यामध्ये तुमचे योगदान देखील आवश्यक आहे. मोदी दिवसाला १८ – १८ तास काम करतात. आपण प्रत्येकाने किमान दोन दोन तास तरी पक्षासाठी द्यावेत. केवळ टीका करण्यासाठी सभा घेऊ नका. जिंकण्यासाठी किती मते आपल्याला कमी पडतात, याचा अभ्यास करून त्याचे नियोजन करा. काही झालं तरी लोकसभेला इकडच्या विद्यमान खासदाराचे डिपॉझिट घालवायचं आहे हे ठरवून काम करा, असे सांगून नारायण राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वात जास्त कोण बोलतो, तर इकडचा दोनदा दहावी नापास झालेला खासदार. ६६ वर्षात काँग्रेसला जमलं नाही एवढं काम मोदींनी ९ वर्षात केल्याचं नारायण राणे म्हणाले.
उद्धव आणी त्याचं ते पिल्लू आदित्य खूप बोलत आहे. हे पिल्लू खार सांताक्रूझला एका अभिनेत्याच्या घरी दररोज संध्याकाळी ७ वाजता यायचा. तीन तास थांबायचा. काय करायचा ? कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा ? सुशांतची हत्या झाल्यावर, दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाल्यावर यायचे बंद का झाले ? अत्याचार करायला राज्य चालवता का ? निरअपराध कलाकाराला मारायला राज्य चालवला काय ? माझं आजही म्हणण आहे, सुशांतसिंग, दिशा सालियन या दोघांचेही खून झाले आहेत. अनेक पुरावे आहेत ते आम्ही दिले आहेत. अजूनही हे बाहेर आहेत. यांना बाहेर राहायचा अधिकार नाही. यवतमाळची चव्हाण तिच्यावर पण अत्याचार झाला, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी विकासाचे कोणते प्रश्न हाताळले. अडीच वर्ष कोकणला काय दिले ? कोकणात कोणता प्रकल्प आणला ? आता कोकणावर प्रेम दाखवता ते फक्त मतांसाठी. सिंधुदुर्ग जिल्ह्याला २५ हजार कोटी देतो सांगितला त्यातील एक रुपया तरी दिला का ? एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी यांनी सत्ता स्वीकारली तेव्हा ७० हजार कोटी तुटीचे राज्य त्यांना सुपूर्द केले. उद्धव हा नेभळट, शेमडा माणूस आहे. एकनाथ शिंदे आणी देवेंद्र फडणवीस हे खूप सहनशील आहेत. एवढी सहनशीलता माझ्याकडे नाही, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.