भारती शिपयार्डमध्ये स्थानिकांवर होणाऱ्या अन्याया विरोधात निलेश राणे आक्रमक

कामगारांचे प्रश्न जाणून घेत कंपनी व्यवस्थापनाशी केली यशस्वी चर्चा ; स्थानिकांना प्राधान्य देण्याची आग्रही मागणी

गुहागर : नव्या व्यवस्थापनासह पुन्हा सुरु झालेल्या दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे अशी आग्रही मागणी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली व्यवस्थापनाकडे केली. तर कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी व्यवस्थापनासोबत त्यांनी बैठकही घेतली. यावेळी दाभोळ येथे कामगार संघटनेची घोषणा निलेश राणे यांनी केली.

दाभोळ येतील भारती शिपयार्ड कंपनी नव्या व्यवस्थापनासह सुरु झाली आहे. मात्र स्थानिक कामगारांवर अन्याय होत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आज गुहागरला भेट दिली. यासाठी दाभोळ ग्रामपंचायत सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच श्रीमती दाभोळकर, उपसरपंच श्री. जावकर यांच्यासह भाजपचे उत्तर रत्नागिरीचे कार्याध्यक्ष केदार साठे, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रविण नलावडे, नंदू चव्हाण आदि कामगार नेते व भाजपा पदाधिकारी यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.

भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरु झाली असली तरीही कंपनीने स्थानिक कामगारांना सामावून घेतेलेले नाही. कामगारांसाठी ठेवलेल्या अटी जाचक आहेत. त्याचवेळी जुन्या व्यवस्थापनाकडचा थकीत वेतनाबाबतचा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही. निलेश राणे यांनी कामगारांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले आणि आपण त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.

या सभेनंतर त्यांनी कामगारांसह कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. उद्योग चालले पाहिजेत हीच आमची भूमिका आहे. मात्र कंपनी चालताना जर स्थानिक कामगारांवर अन्याय होत असेल, ते उपाशी राहणार असतील तर आम्ही कामगारांच्या बाजूने उभे राहणार असा स्पष्ट इशारा त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला. कामगारांसह कंपनी व्यवस्थापनाची बाजू सुद्धा त्यांनी प्रतिनिधींकडून जाणून घेतली. तर स्थानिकांना सामावून घेण्यासाठी तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!