कणकवली पुन्हा रक्तरंजित …
पॉलिटिकलनामा
कुणाल मांजरेकर
राजकिय दृष्टीने अतिसंवेदनशील समजली जाणारी कणकवली जिल्हा बँक निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हादरली आहे. शिवसेना नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे करंजेचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर शनिवारी सकाळी ११ वाजता इनोव्हा कार मधून आलेल्या दोघांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला. राजकिय वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत असून शिवसेना नेते सतीश सावंत यांनी या हल्ल्याला थेट भाजपा आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना जबाबदार धरले आहे. तर शिवसेना खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्र्यांचे बंधू किरण सामंत यांच्यातील अंतर्गत वादातून ही घटना घडल्याचा संशय आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. कणकवली शहराला रक्तरंजीत राजकारणाचा इतिहास आहे. राणेंच्या भाजपा प्रवेशानंतर जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडी बरोबरच भाजपा साठी प्रतिष्ठेची आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीत घडलेल्या या हल्ल्यामुळे जिल्हा हादरला असून ह्या हल्ल्यामागील कारण शोधण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी होणार का ? याची उत्सुकता आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा राजकीय दृष्टीने संवेदनशील समजला जातो. कणकवली तर राजकिय राड्याचा हॉटस्पॉट असून कणकवलीने आजवर अनेकदा राजकिय राडे अनुभवले आहेत. यामध्ये श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे यांच्या सारख्या लोकनेत्यांच्या हत्याही झाल्या. मात्र अलीकडे काही वर्षे कणकवलीसह जिल्हा शांत असताना जिल्हा बँक निवडणूकीच्या तोंडावर सतीश सावंत यांच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता होती. यावेळी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नारायण राणे यांचे खंदे समर्थक असलेल्या सतीश सावंत यांच्यावर सोपविण्यात आली. सतीश सावंत यांनी अतिशय मेहनतीने या बँकेचा कारभार चालवला. यामुळे सिंधुदुर्ग बँकेचा राज्यात नावलौकिक झाला. यानंतरच्या काळात नारायण राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पडत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. यावेळेस सतीश सावंत हे देखील राणेंसोबत स्वभिमान पक्षात दाखल झाले. मात्र मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणे आणि त्यांच्या मुलांशी बिनसल्याने सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांच्या विरोधात सतीश सावंत यांना उमेदवारी देऊन राणेंना आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीत नितेश राणेंनी अपेक्षित विजय संपादन केला. सतिश सावंत यांच्या शिवसेना प्रवेशानंतर जिल्हा बँकेवर आपसूकच शिवसेनेची सत्ता आली. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाल्याने जुन्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांचे पाठबळही सतीश सावंत यांना मिळाल्याने सतीश सावंत यांना अध्यक्षपदावरून बाजूला करणे राणेंना शक्य झाले नाही. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सतीश सावंतांचा पराभव करून जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. त्यामुळे यंदाची जिल्हा बँक निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची बनली आहे. भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत स्वबळावर उतरली असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवार उभे केले आहेत. कणकवली हा सतिश सावंतांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या निवडणुकीत सतीश सावंत यांना पराभूत करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी व्यूहरचना केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत शनिवारी शिवसेना कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नितेश राणे, गोट्या सावंत यांच्या भाडोत्री गुंडांकडून हल्ला
संतोष परब यांच्यावर झालेला हा प्राणघातक हल्ला आमदार नितेश राणे आणि माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक दहशतवादाने जिंकण्याचा राणेंचा डाव असल्याचे सांगत २०१५ मध्ये राणेंची साथ सोडणाऱ्या राजन तेली यांच्यावर देखील अशाच प्रकारे सावंतवाडीच्या विश्रामगृहामध्ये हल्ला झाला होता. सहकार क्षेत्रात खुनी हल्ले करून दहशतवादाने जिल्हा बँक ताब्यात घेण्याचा राणेंचा प्रयत्न असून जिल्ह्यातील जनता राणेंच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देईल, अशी प्रतिक्रिया सतीश सावंत यांनी आहे.
करंजेचे माजी सरपंच असलेल्या संतोष परब यांच्यावर शनिवारी सकाळी ११ वाजता चाकूहल्ला झाला. सकाळच्या सुमारास ते मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या विनानंबरप्लेट ईनोव्हा कारने त्यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर हॉस्पिटल समोर मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडले असताना इनोव्हा कार मधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकूसदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे कणकवली सह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून तालुक्यातील शिवसैनिकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन परब यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, आमदार वैभव नाईक यांनीही रुग्णालयात जाऊन या घटनेची माहिती घेतली. या हल्ल्यामुळे शिवसेनेत संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस यंत्रणेनेही या हल्ल्याची दखल घेतली आहे.
सतीश सावंतांना पोलीस संरक्षण द्या : भाजपची मागणी
या हल्ल्यानंतर कणकवलीतील राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचे शिवसेनेचे म्हणणे असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होईपर्यंत बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने कणकवली पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या हल्ल्यामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नावे देण्यात आली आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेतेमंडळी बरोबर फिरत असलेले काही लोक हे हिस्ट्रीसिटर असून त्यांनीच हा हल्ला केला असण्याची दाट शक्यता आहे व त्याचे खापर भाजपाच्या कार्यकर्त्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या सिंधुदुर्गात निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. आणि या निवडणुकांमध्ये जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी अशाप्रकारे भाजपाच्या कार्यकर्त्यांची नावे गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला हा आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याची चर्चा असून ज्याठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला तेथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून आणि संतोष परब यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने कणकवली पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
विनायक राऊत – किरण सामंत यांच्यातील वादातून हल्ला : नितेश राणेंचा दावा
भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेतील अंतर्गत राजकारणावर या हल्ल्याचे खापर फोडले आहे. शनिवारीच शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करून रत्नागिरीतील शिवसेना अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले आहेत. असेच गटातटाचे राजकारण खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यात सुरू आहे. या दोघांच्या वादातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविताना सिंधुदुर्गात काहीही झाले तरी त्यामध्ये राणेंना गोवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असे सांगतानाच हल्ल्यानंतर सदरील इनोव्हा कार रत्नागिरीच्या दिशेने पळून गेल्याचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.
रक्तरंजित राजकारणाचा अंत केव्हा ?
सिंधुदुर्ग जिल्हा राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. आजवर अनेक निवडणुकांमध्ये याठिकाणी अनेकांची डोकी फुटली तर अनेक कार्यकर्त्यांचे रक्त सांडले. अलीकडील काही वर्षे येथील निवडणुका भयमुक्त वातावरणात संपन्न झाल्या. मात्र पुन्हा एकदा जिल्ह्यात रक्तरंजित इतिहासाची उजळणी होते का ? असा प्रश्न कणकवलीतील खुनी हल्ल्याने निर्माण झाला आहे. हा हल्ला राजकीय कारणाने झाला की त्या हल्ल्यामागील कारणे काही वेगळी आहेत, त्याबाबतचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस राजकीय दडपण न आणता या हल्ल्याचा तपास करणार का ? असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.