मत्स्यव्यवसायला कृषीचा दर्जा ; मालवणात महायुती पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष !


मालवण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती शासनाने राज्यातील मच्छिमारांच्या दृष्टीने कल्याणकारी असा ऐतिहासिक निर्णय घेत मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. यामुळे मत्स्य व्यवसायिकांमध्ये समाधान व्यक्त केला आहे. मालवणात भाजप व शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत भरडनाका येथे फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. महायुती सरकारचा विजय असो… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है… मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा मच्छिमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गांवकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, राजन वराडकर, गणेश कुशे, बबलू राऊत, किसन मांजरेकर, सुरेश बापर्डेकर, दाजी सावजी, विलास मुणगेकर, मोहन कुबल यांसह मच्छिमार प्रतिनिधी व इतर उपस्थित होते.

यावेळी प्रभाकर सावंत म्हणाले, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळावा हि मच्छिमारांची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती. या मागणीला न्याय देण्याचे काम मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून पाठपुराव्यातून महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून पुर्ण होत आहे. यासाठी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांचाही पुढाकार राहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाने या मागणीला मंजुरी देत मत्स्य व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिला. राज्य शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमातील हा एक अलौकिक निर्णय आहे. मत्स्य व्यवसायाला कृषिचा दर्जा नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेणे, प्रकल्प राबविणे यामध्ये मच्छिमारांना अडचणी येत होत्या. आता या अडचणी दूर होऊन मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणेच विविध लाभ, सुविधा व योजना देणे सुलभ होणार आहे. नीलक्रांतीचे प्रकल्प राबविणे शक्य होणार आहे, असेही सावंत म्हणाले.
यावेळी रविकिरण तोरसकर यांनी महायुती सरकारने मच्छिमारांची अनेक वर्षांची मागणी केली आहे, याबद्दल महायुती सरकारचे व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे मच्छिमारांच्या वतीने तसेच भाजप व शिवसेना यांच्यातर्फे आम्ही आभार मानतो असे सांगितले.

