चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार ; महावितरणची प्रशासकीय मान्यता


पालकमंत्री नितेश राणें यांनी जिल्हा नियोजनमधून दिला २ कोटी ३७ लाख निधी ; विमानतळाच्या विद्युतीकरण व नाईट लँडिंगचा प्रश्न निघणार निकाली
सिंधुदुर्ग : गेल्या तीन वर्षांपासून चिपी विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या विद्युतीकरणाच्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. विमानतळावरील विद्युतीकरणाच्या समस्यांसहित लाईन शिफ्टिंग व रूपांतरणाच्या कामासाठी जिल्हा नियोजन मधून दोन कोटी 37 लाख 57 हजार रुपयांच्या खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नाईट लँडिंगची समस्या सुटणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार सदरची कार्यवाही करण्यात आली आहे. चिपी विमानतळ करिता महावितरणने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

चिपी विमानतळासाठी वीज पुरवठा करण्याच्या अनुषंगाने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याने सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील पाट फिडरकडून जाणाऱ्या ११ केव्ही लाईनच्या शिफ्टींग व रूपांतरणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख ५७ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जिल्हा नियोजनमधून या कामासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
चिपी विमानतळ सुरू होवून तीन वर्षे उलटून गेली तरी याठिकाणी नाईट लँडिंगचा प्रश्न रेंगाळला होता. तसेच विमानतळावर विद्युतीकरणाच्या अनुषंगाने अनेक समस्याही प्रलंबित होत्या. यासाठी वीज कंपनीच्या पाट येथील फिडरकडून वीज पुरवठा होत असताना ११ केव्हीच्या मुख्य लाईनच्या शिफ्टिंगसाठी मोठा खर्च होता. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून यासाठीचा निधी देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार या कामासाठी जिल्हा वार्षिक योजना कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी व प्रशासकीय मान्यतेसाठीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या अंतर्गत विद्युतीकरण, वाढीव पथदिवे, अंतर्गत उच्च दाबाच्या वीजवाहिन्या, लघुदाबाच्या विजवाहिन्या उभारणे, नवीन रोहित्र रोहित क्षमता वाढवणे आदी कामांचा समावेश आहे. सदरच्या कामाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून तांत्रिक मान्यता देत निधीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्हा नियोजन समितीने २ कोटी ३७ लाखांच्या उपलब्धतेसाठी मान्यता दिली होती. यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. सदर कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे तातडीने हे काम सुरू होणार आहे.
बंद विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न
चिपी विमानतळावर बंद असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी फ्लाय ९१ च्या अधिकाऱ्यांशी सोमवारी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठक घेतली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी येथील विजेची समस्या मिटविण्यासाठीच्या कामालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता चिपी विमानतळावरून जास्तीत जास्त विमानसेवा सुरू करण्यासाठी मंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत.
नाईट लँडिंगचा प्रश्न निकाली लागेल
चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली तरी आवश्यक विद्युतीकरणाच्या अभावामुळे नाईट लँडींगचा मोठा प्रश्न होता. मात्र, आता विजेची समस्या मिटविण्यासाठी निधी मंजूर झाल्यामुळे भविष्यात येथील नाईट लँडिंगचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.

