गावविकासाच्या दृष्टीने तोंडवळी तळाशील ग्रामस्थांच्या मागण्या आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने सोडवणार


शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची ग्वाही ; गावातील खड्डेमय १२०० मिटर रस्त्याचे डांबरीकरण स्वखर्चाने करून देण्याचा दिला शब्द
मालवण : येत्या पाच वर्षात खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदार संघासोबत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गतिमान विकास होणार आहे. यात प्रत्येक गाव विकासाच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्यात येत आहे. एका बाजूने समुद्र व दुसऱ्या बाजूने खाडीने वेढलेल्या तोंडवळी तळाशीलच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही कटीबद्ध आहोत. गाव विकासाच्या दृष्टीने ग्रामस्थांच्या मागण्या आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने सोडवल्या जातील, असा शब्द शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी तळाशील ग्रामस्थांना दिला आहे.

दरम्यान, गावात येणारा मुख्य रस्ता मोठया प्रमाणात खड्डेमय बनला आहे. जो भाग अधिक खड्डेमय आहे त्यापैकी सुमारे 1200 मिटर रस्ता 15 मे पूर्वी स्वखर्चाने डांबरीकरण करून देऊ. असा शब्द दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना दिला. उपस्थित सर्व ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांच्या भूमिकेचे टाळ्या वाजवून उत्स्फूर्त स्वागत केले.
यावेळी ग्रामस्थानीही आपल्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या. 1990 साली राणे साहेब आमदार, मंत्री झाल्यानंतर कोकणात खऱ्या अर्थाने निधीचा ओघ वाढला, कोकणचा विकास झाला. असे जयहरी कोचरेकर यांनी सांगितले. तर तोंडवळी तळाशील गावचा विकास राणे साहेबांच्या हातूनच होणार. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यात महत्वाची भुमिका बजावतील असा ठाम विश्वास संजय गोविंद तारी यांनी व्यक्त केला. तर संजय केळूसकर यांनी विकासाच्या अनेक मांगण्या व भेडसावणाऱ्या समस्या मांडताना या सर्व शासनाच्या माध्यमातून सोडवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली.
तळाशील ग्रामस्थांनी श्री गोपाळकृष्णमंदिर येथे एकत्र येत आपल्या विविध मागणण्यांचे निवेदन तळाशील ग्राम विकास मंडळाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना दिले. यावेळी दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष संजय केळूसकर, सल्लागार जयहरी कोचरेकर, संजय गोविंद तारी, ग्रामपंचायत सदस्य भूपाळ मालंडकर, संजय अं. तारी, धर्माजी कोचरेकर, दशरथ कोचरेकर, नागेश कोचरेकर, बाबू रेवंडकर, धर्माजी रेवंडकर, केशर जुवाटकर, हर्षल केळुसकर, रवी कोचरेकर, अजित केणी यांसह ग्रामस्थ व महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच दत्ता सामंत यांच्या सोबत माजी नगरसेवक दीपक पाटकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, डॉ. प्रमोद कोळंबकर, भाऊ मोरजे, मंदार लुडबे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी गावविकासाच्या दृष्टीने मागणी करताना सांगितले, मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशिल वाडीच्या पुर्वेस कालावल खाडी असून मागील बरीच वर्षे मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन झाल्यामुळे खाडी किनाऱ्यावरील स्थानिकांच्या जमिनीचा काही भाग खाडीमध्ये वाहून गेलेला आहे. शासनाने सदर किनाऱ्याची मोजणी केल्यास तो फरक लक्षात येईल. तसेच काही स्थानिकांच्या ७/१२ वर जमिन पाण्याखाली वाहून गेल्याचा शेरा देखील आहे. तळाशिल वाडीच्या नदी किनाऱ्याची सतत धूप झाल्यामुळे खाडीची रुंदी वाढत आहे. त्यामुळे वाडी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा सदर खाडी किनाऱ्याकडील वाहून गेलेला भुभाग पूर्ववत करण्यात यावा व त्यावर धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा. तळाशिल वाडीमध्ये पर्यटन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो. सदर खाडी किनाऱ्यावरील बंधाऱ्यावरून रस्ता झाल्यास पर्यटन व्यवसायाला अधिक गती प्राप्त होईल. तसेच तळाशिल वाडीच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून दिवसें दिवस समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने किनाऱ्याची प्रचंड प्रमाणात धुप होत आहे. त्यामुळेच नदी आणि समुद्र किनाऱ्यामधील अंतर काही ठिकाणी अगदी १००-१५० फुट इतके राहीलेले आहे. त्यामुळे तळाशिल वाडीतील ग्रामस्थांनी यापुर्वी मागणी केल्यानुसार समुद्राच्या बाजूने कायम स्वरुपी धुप प्रतिबंधक बंधा-याच्या कामाचे २ टप्पे पूर्ण झाले असून अजित रेवंडकर घर ते उत्तरेकडील प्रकाश बापर्डेकर यांच्या घरापासून ते गोविंद पेडणेकर यांच्या घरापर्यंतचा भाग हा अतिसंवेदनशील असल्याने तेथे तातडीने बंधारा होणे गरजेचे आहे. तळाशिल वाडीतील नदी किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धुप झाल्याने दिवसेंदिवस विहीरींमधील पाणी क्षारयुक्त बनत चालले आहे. त्यामुळे आजार बळावत चालले आहेत. यावर त्वरीत आणि कायम स्वरूपी उपाययोजना न झाल्यास भविष्यात बिकट परिस्थितीला समोरे जावे लागेल. अनधिकृत वाळू उपश्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून यावर ठोस कारवाई व उपाययोजना व्हावी. यासह मुख्य रस्ता खड्डेमय बनला असून त्याचे डांबरीकरण दर्जेदार व्हावे, वीज समस्या सोडवण्यासाठी दोन ट्रान्सफार्मर मंजूर व्हावेत, रेवंडी तळाशिल पूल उभारणी व्हावी, गावासाठी नळपाणी योजना आणावी अश्या गावविकासाच्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या. या सर्व मागण्या आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राधान्य क्रमाने सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू. असे दत्ता सामंत यांनी सांगितले.

